
वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी : पाटोळे (ता. सिन्नर) :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोळे येथे आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध योग प्रकारांचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात योगिक जॉगिंगसह हठयोगातील शुद्धिक्रियांवर विशेष भर देण्यात आला.

यावेळी हठयोग प्रदीपिका ग्रंथातील शरीराच्या आंतरशुद्धीसाठी उपयुक्त असलेल्या षटकर्मांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. धौती, बस्ती, नेती, त्राटक, नौली व कपालभाती या सहा शुद्धिक्रियांपैकी जलनेती, सूत्रनेती व बिंदू त्राटक या क्रियांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक शाळेचे मुख्याध्यापक वसंत गोसावी यांनी सादर केले.
विद्यार्थ्यांना प्राचीन यौगिक प्रक्रियांचा आपला समृद्ध वारसा, त्याचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या क्रिया उत्सुकतेने समजून घेत निरामय व संतुलित जीवनासाठी योगाचे महत्त्व जाणून घेतले.
या उपक्रमावेळी शाळेचे शिक्षक कैलास पवार, मीना सोनवणे, प्रतिभा पवार, सुनिता खताळे आदी उपस्थित होते. सदर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण झाली असून शाळेच्या आरोग्यवर्धक उपक्रमांचे विद्यार्थी व पालकांनी स्वागत केले आहे.
