
जळगाव निंबायती (वार्ताहर) कविता म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नसून, ती मानवी मनाला व जीवनाला दिशा देणारी एक मार्गदर्शक शक्ती आहे. कवितेतून केवळ भावना व्यक्त होत नाहीत, तर विचारांना स्पष्टता येऊन जगण्याची प्रेरणा मिळते त्यातून मानसिक ताण कमी होतो, सकारात्मक दृष्टीकोन रुजतो, संकटांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य मिळते. असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी व अभिनेते राजेश जाधव यांनी केले येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गो. य. पाटील विद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन व शुभचिंतन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी जेष्ठ प्रा. पी. जी. माने होते.

यावेळी जाधव म्हणाले ‘शब्द चुकले तर वाक्य चुकते पण मित्र चुकले तर आयुष्य चुकते’ म्हणून चांगल्या मित्रांची निवड करा. कवितेतील ओळी नैतिक मूल्ये, आशावाद आणि निष्ठेचे महत्त्व अधोरेखित करतात, त्यामुळे व्यक्तीला यशाचा योग्य मार्ग शोधण्यात मदत होते. यावेळी जाधव विविध प्रकारच्या स्वरचित कविता, गाणी सादर केलेत. तसेच बासरी वादन केले. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, संस्थेचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील प्रतिष्ठीत नागरिक, पालक, ग्रामस्थ, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त केला.

. प्रा. दीपक जमधाडे यांनी शिक्षकीय मनोगतातून विद्यार्थ्यांना परीक्षा व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात, प्रास्ताविक पर्यवेक्षक व्ही. डी. काळे यांनी केले, प्रा. पी. यु. शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, सूत्रसंचलन प्रा. दीपक बोरसे यांनी केले, तर आभार प्रा. प्रशांत देवरे यांनी मानलेत. समारोपप्रसंगी उपस्थितांनी अल्पोपाहाराचा आस्वाद घेतला.
