
वसंत गोसावी, सिन्नर (प्रतिनिधी) : राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन तीन मार्च अखेर करण्याचे आदेश नुकतेच माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर व प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत. या आदेशामुळे महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक व केंद्रप्रमुख सभा यांचेसह विविध संघटनांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवरील 23/4/2025 रोजी दिलेली स्थगिती आता उठवण्यात आली आहे. न्यायालयाने यासंबंधीच्या सर्व याचिका निकाली काढल्या आहेत.आता 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार हे समायोजन होणार आहे . सन 2025- 26 ची संच मान्यता ही 23 ऑक्टोबर 2025 च्या पटावर नोंद असलेल्या आधार वरील वैध विद्यार्थी संख्येनुसार करण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आधार वैध नसणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार आहे. अतिरिक्त ठरलेल्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी रिक्त पदे उपलब्ध असलेल्या शाळांमध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे.
जिल्हास्तरीय समायोजन वेळापत्रक:
13/2/2026 – रिक्त जागा घोषित करणे.
20/2/2026 -रिक्त जागा व अतिरिक्त कर्मचाऱ्यांची अंतिम यादी घोषित करणे.
3/3/2026- समुपदेशनाद्वारे समायोजन करणे.
विभाग स्तर समायोजन प्रक्रिया- 6/3/2026 ते 25 /3/ 2026.
राज्यस्तर समायोजन 31/ 3 /2026 पर्यंत.
असे होणार शिक्षक समायोजन
महाराष्ट्रात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन 2025-2026 च्या संच मान्यतेनुसार व 23/10/2025 रोजीच्या पटसंख्येनुसार होणार.
15 मार्च 2024 च्या सुधारित निकषानुसार संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक रिक्त जागांवर वर्ग केले जाणार.
संचमान्यता निकषानुसार आधार कार्ड वैध पटसंख्येच्या आधारे अतिरिक्त शिक्षक ठरवले जाणार.
अतिरिक्त शिक्षकांचे प्रथम त्याच व्यवस्थापनाच्या शाळेत, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेत आणि शेवटी इतर शाळांमध्ये समायोजन होणार.
सेवाज्येष्ठतेनुसार जो शिक्षक कनिष्ठ आहे, त्याला अतिरिक्त ठरवून प्रथम त्याला समायोजित केले जाणार.
नो वर्क नो पे 2016 च्या निर्णयानुसार समायोजन झालेनंतर समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन अनुदान मूळ शाळेतून दिले जाणार नाही यावर भर दिला जाणार.
