
जव्हार प्रतिनिधी-:
पालघर जिल्हा परिषदेमार्फत अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अधिकारी–कर्मचारी क्रीडा स्पर्धा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये जव्हार तालुक्याने उत्कृष्ट नियोजन, काटेकोर तयारी आणि संघभावनेच्या जोरावर विविध क्रीडाप्रकारांत उल्लेखनीय यश संपादन करत जिल्हा स्तरावर आपली प्रभावी छाप उमटवली.

दिनांक ३१ जानेवारी २०२६ पासून सुरू झालेल्या या तीन दिवसीय स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद मुख्यालयासह पालघर जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. क्रिकेट, खो-खो, कबड्डी, रिले, धावणे (पुरुष व महिला), व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, कॅरम, संगीत खुर्ची, गोळाफेक, थाळीफेक, रांगोळी आदी विविध खेळांचा या स्पर्धांमध्ये समावेश होता.

क्रिकेट फायनलमध्ये जव्हारची सरशी
या स्पर्धांतील क्रिकेटचा अंतिम सामना जव्हार व विक्रमगड तालुक्यांच्या संघांमध्ये अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडला. या सामन्यात जव्हार तालुक्याच्या संघाने संयमी फलंदाजी, अचूक गोलंदाजी व उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर विक्रमगड संघावर मात करत प्रथम क्रमांक पटकावला व क्रिकेटचा चषक जिंकला. या विजयामुळे जव्हार तालुक्याच्या एकूण कामगिरीत महत्त्वपूर्ण भर पडली.
जव्हार तालुक्याचे काटेकोर नियोजन ठरले यशाचे गमक
जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी जव्हार तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तालुका स्तरावरच प्रभावी नियोजन व तयारी केली होती. क्रिकेट, खो-खो, कबड्डी, रिले तसेच पुरुष व महिला धावणे या क्रीडाप्रकारांत उत्तम खेळाडूंची प्राधान्याने निवड, नियमित सराव व योग्य मार्गदर्शन केल्यामुळे जव्हार तालुक्याच्या संघांनी जिल्हा स्तरावर विविध खेळांत विजय मिळवला.
या यशामागे मा. गटविकास अधिकारी दत्तात्रय सुखदेव चित्ते, सहाय्यक गटविकास अधिकारी संदेश दुमाडा, परीक्षाधीन गटविकास अधिकारी अमित भोये, सहाय्यक प्रशासन अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी संजय शेळकंदे, प्रवीण चौधरी तसेच सर्व विभागप्रमुख यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी संघाच्या तयारीसाठी वेळ देत खेळाडूंना आवश्यक ते सहकार्य, मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण
या क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ जिल्हा परिषद पालघर मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीकमसलत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास) व्यंकटराव हुंडेकर तसेच सर्व विभागप्रमुख व गटविकास अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी हसत-खेळत व शिस्तबद्ध पद्धतीने स्पर्धा पार पडल्याबद्दल सर्व सहभागी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच भविष्यातही अशा क्रीडा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. क्रीडा स्पर्धांसाठी मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे त्यांनी आभार मानले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनीही कार्यालयीन कामासोबतच शारीरिक तंदुरुस्ती, खेळभावना व सांघिक भावना जोपासणाऱ्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
स्पर्धांतील सर्व विजेत्या खेळाडू व संघांना स्मृतिचिन्हे, प्रमाणपत्रे व पदक देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते प्रत्येकी रु. १०००/- रोख बक्षीस देऊन त्यांचे मनोबल वाढविण्यात आले.
तसेच या क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या नियोजन समितीचे सदस्य, पंच व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
