
नाशिक जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने सिन्नर तालुक्यात 11 केंद्रांवर पूर्व उच्च प्राथमिक म्हणजे पाचवी व उच्च प्राथमिक म्हणजे आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या सराव परीक्षेला उत्साहात प्रारंभ झाला आहे. या सराव परीक्षेसाठी तालुक्यातील एकूण ६४४ विद्यार्थी सहभागी झाले असून त्यामध्ये पाचवीचे 622 व आठवीचे 20 विद्यार्थी सराव परीक्षा देत आहेत.

ही सराव परीक्षा तालुक्यातील केंद्र व कंसात पाचवी ते आठवी चे परीक्षार्थी याप्रमाणे -शहा (71), डुबेरे (29+3), ठाणगाव (25), ब्राह्मणवाडे (56), दापुर (56), सोनांबे(60), विंचूरदळवी (85+17), सिन्नर (65), मुसळगाव (110), बारागाव पिंपरी (42) व मह्रळ (45) अशा अकरा परीक्षा केंद्रांवर सुरळीतपणे पार पडत आहे. पेपर एक मध्ये प्रथम भाषा व गणित तर पेपर दोन मध्ये इंग्रजी व बुद्धिमत्ता याप्रमाणे परीक्षा होणार आहे प्रत्येक केंद्रावर केंद्रप्रमुख व शिक्षकांनी परीक्षेचे काटेकोर नियोजन केले आहे.
तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी राजेश डामसे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती सुनिता आहेर यांच्या संयोजनातून ही परीक्षा घेण्यात येत आहे. डुबेरे केंद्रांच्या सराव परीक्षेचे नियोजन पाटोळे शाळेत करण्यात आले होते. केंद्रप्रमुख विजय निरगुडे, वडगावचे मुख्याध्यापक सुधाकर अहिरे, पाटोळेचे मुख्याध्यापक वसंत गोसावी यांनी परीक्षेचे पर्यवेक्षण केले. चास, किरतांगळी, वावी, पाथरे, दोडी बु. या केंद्रातून जिल्हा परिषद शाळांचे पाचवी व आठवी चे वर्ग नसल्याने त्या केंद्रात ही परीक्षा झाली नाही.
शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाची पायरी असून या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती, अभ्यासाची शिस्त, आत्मविश्वास व बौद्धिक विकास साधला जातो. सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची परीक्षेची भीती कमी होऊन प्रत्यक्ष परीक्षेसाठी योग्य तयारी होते. प्रश्नपत्रिकेचा अंदाज, वेळेचे नियोजन आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी ही सराव परीक्षा निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
या उपक्रमामुळे सिन्नर तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश मिळेल, असा विश्वास शिक्षकवर्ग व पालकांनी व्यक्त केला आहे.
