
वसंत गोसावी: सिन्नर (प्रतिनिधी )– मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे बारागाव पिंपरी ग्रामपंचायतीत लोकसहभागाचा आदर्श उपक्रम साकार झाला आहे. या अभियानांतर्गत गावातील दानशूर नागरिकांच्या पुढाकारातून ग्रामपंचायतीला तब्बल एक लाख दहा हजार रुपये किंमतीचे विविध उपयुक्त साहित्य प्राप्त झाले आहे.

या उपक्रमामध्ये ग्रामपंचायतीसाठी पाणी फिल्टर, सोलर इन्व्हर्टर, ब्लूटूथ साऊंड सिस्टिम तसेच ३२ इंची एलईडी टीव्ही अशी अत्यावश्यक साधनसामग्री सुपूर्द करण्यात आली. विजयकुमार उगले यांनी १७ हजार रुपयांचा पाणी फिल्टर, तर दुग्ध व्यावसायिक कैलास उगले व दत्तू बोराडे यांनी २१ हजार रुपये किंमतीचा सोलर इन्व्हर्टर दिला. संकल्प क्लासेसचे संचालक श्री. रायते सर यांनी ९ हजार रुपये किंमतीच्या सहा ब्लूटूथ साऊंड सिस्टिम ग्रामपंचायतीस भेट दिल्या.
याशिवाय दिनकर उगले, दत्ता गोसावी, संपत घुगे, दत्तात्रय तुकाराम उगले, दशरथ गोडगे, श्री. नागरे बाबा तसेच सरपंच सौ. संध्या कटके व उपसरपंच योगेश गोराडे यांनी प्रत्येकी ९ हजार रुपये किंमतीचे ३२ इंची एलईडी टीव्ही ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केले. या सर्व साहित्याची एकूण किंमत १ लाख १० हजार रुपये इतकी आहे.
या दानशूर व्यक्तींचा ग्रामपंचायतीच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य विजय उगले, बापूसाहेब उगले, ॲड. अनिल उगले, अनिता पानसरे, अनिता कापसे यांच्यासह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याच अभियानाच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीतर्फे प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली. प्लास्टिकच्या वापरामुळे होणारे पर्यावरणीय असंतुलन व आरोग्यावरील दुष्परिणाम याविषयी ग्रामविकास अधिकारी परेश जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थांना कापडी पिशव्यांचे वाटप करून प्लास्टिकमुक्त गावासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी परेश जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य ॲड. अनिल उगले यांनी केले.
