
वसंत गोसावी, सिन्नर (प्रतिनिधी ): सिन्नर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. विजय बागुल यांच्या वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिकारी / कर्मचारी शोधनिबंध स्पर्धेत “गुणवत्तापूरक शाळा भेटी ” या शोधनिबंधाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. डॉ. बागूल यांच्या या यशामुळे सिन्नर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा नावलौकिक वाढविला आहे.
शिक्षणातील अधिकारी यांचे शाळाभेटींचे नवनवीन प्रयोग, शाळा व विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठीचे प्रभावी उपक्रम या विषयावर त्यांनी सादर केलेला शोधनिबंध परीक्षकांच्या विशेष प्रशंसेस पात्र ठरला. पांढुर्ली बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीने, नियोजनबद्ध कामकाजाने व नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाने सर्व शिक्षकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल गटविकास अधिकारी अशोक भवारी, गटशिक्षणाधिकारी राजेश डामसे तसेच विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी डॉ.विजय बागुल यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ. विजय बागुल यांच्या या यशामुळे सिन्नर तालुक्यातील शिक्षक व शिक्षण क्षेत्राला नवसंजीवनी मिळाली असून भविष्यातही असेच प्रेरणादायी कार्य घडावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
