
नाशिक:( प्रतिनिधी)-वारली चित्रकलेत दैनंदिन जीवनातील प्रसंग आणि घडामोडी यांचे जिवंत चित्रण केले जाते. त्यामुळे वारली चित्रसंस्कृती ही जगण्याची अनमोल परिभाषा आहे, असे प्रतिपादन आरजे श्रद्धा कराळे यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित हुतात्मा स्मारक येथे आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या अभिनव उपक्रमात २२६वे ‘वारली चित्रसंस्कृती’ या पुस्तकावर गुंफताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तुकाराम ढिकले होते.
श्रद्धा कराळे पुढे म्हणाल्या की, चित्रकाराची भावना काय आहे; हे चित्रावरून कळत असते. वारली चित्रकला ही रूढीपरंपंरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. वारली चित्रकला भविष्यात लोप पावू नये, यासाठी वारली चित्रसंस्कृती जपण्याची गरज आहे. समाज प्रबोधनासाठी चित्र नेहमी महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. चित्रसंस्कृती समजून घेतली पाहिजे. त्यातून निसर्ग आणि संस्कृतीचा वारसा जपणे सोपे जाते, असेही त्या म्हणाल्या.
कैलास बोडके आणि अजित कुलकर्णी यांना ग्रंथभेट देण्यात आली. योगाचार्य अशोक पाटील यांनी आभार मानले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान येत्या शुक्रवारी (६) नंदन राहाणे ‘उन्हाची झुंबरे’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा मारणार आहेत.
