
नाशिक : दि.३ वार्ताहर
येथील ‘मविप्र’ संचलित माधवराव बोरस्ते विद्यालय, ओझर (नाशिक) यांच्या “रामा रे” या बालनाट्यास महाराष्ट्र शासन आयोजित २२ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेत राज्यस्तरीय द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. इतकेच नव्हे तर या नाटकाने विविध विभागांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. दिग्दर्शन – द्वितीय पारितोषिक (उर्वराज राजेंद्र गायकवाड) रंगभूषा – द्वितीय पारितोषिक (राहुल ठाकूर),
प्रकाश योजना – द्वितीय पारितोषिक (प्रणव सपकाळे),
संगीत – प्रथम पारितोषिक (राजकुमार हिनल), तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता (रौप्यपदक) हा मान राम्या ही भूमिका साकारणाऱ्या विद्यार्थी समर्थ वाघ याने मिळवला आहे. ही स्पर्धा अहिल्यानगर, नाशिक व धुळे या तिन्ही केंद्रांचा एकत्रित निकाल असून, या स्पर्धेत “रामा रे” या बालनाट्याने राज्यस्तरावर द्वितीय पारितोषिक पटकावले आहे.

हा विजय केवळ बक्षिसांचा नसून तो मेहनत, लोकपरंपरा, संघभावना आणि विश्वास यांचा संगम असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. प्रत्येक कलाकार, नेपथ्य, प्रकाश, संगीत, रंगभूषा, विंगमध्ये उभे राहून साथ देणारे शिक्षक तसेच पालकांचा हा सामूहिक विजय असल्याचे गौरवोद्गार काढले जात आहेत. “रामा रे” या नाटकाने केवळ स्पर्धा जिंकली नाही, तर आपली छाप राज्यपातळीवर उमटवली आहे. नाटक सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका शितल हांडोरे, शकुंतला आगळे यांचे मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती डी.बी.मोगल, संचालक शिवाजी गडाख, संचालिका शोभाताई बोरस्ते, शालेय समिती अध्यक्ष भास्करराव शिंदे, व्यवस्थापनचे अध्यक्ष प्रकाश महाले, मुख्याध्यापक सोपान वाटपाडे, उपमुख्याध्यापक सतीश केदार, पर्यवेक्षक दशरथ शिंदे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
