
नाशिकरोड:-( प्रतिनिधी ) मैदानी खेळ खेळल्याने व्यायामासह बुद्धी तल्लख होते. त्याचबरोबर मैदानावर सातत्याने खेळल्याने पुढील काळात आरोग्यही उत्तम राहते. म्हणूनच विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात मोबाईलपेक्षा मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे यांनी केले.

पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात आयोजित वार्षिक क्रीडा स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. श्रीमंत श्री नर्सरीचे संचालक हिरामण आडके, कवी शरद आडके, पालक शिक्षक संघाचे माजी उपाध्यक्ष भास्कर सानप, नासाका बचाव कृती समितीचे अध्यक्ष विलास गायधनी, माजी सैनिक राजेश रुद्रे, गणेश शिंदे, मुख्याध्यापक अरुण पगार, ग्रंथपाल शामराव गायधनी, एनडीएसटी ॲण्ड एनटी सोसायटीचे संचालक संग्राम करंजकर, प्रांजल रुद्रे मंचावर उपस्थित होते.

श्री. गोडसे यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात अभ्यासाबरोबरच क्रीडा स्पर्धांसारखे सहशालेय उपक्रम महत्त्वाचे असल्याचे सांगितले तर माजी सैनिक राजेश रुद्रे यांनी ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटाचे कथानक आणि देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या आयुष्यात क्रीडाकौशल्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. पाहुण्यांच्या हस्ते सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारांतील विजयी स्पर्धकांचे सुवर्णपदके देऊन अभिनंदन करण्यात आले.

स्पर्धेत सर्वाधिक नैपुण्य दाखवणाऱ्या पायल सानप, सृष्टी आडके, साहिल गोरे (लहान गट), जान्हवी सानप, खुशी सानप, प्रसाद आडके, साईराज गोडसे (मध्यम गट), मानसी आडके, वैष्णवी सानप, प्रणव गायधनी, आर्यन सानप, ओम जाधव या विद्यार्थ्यांना ‘उत्कृष्ट क्रीडापटू पुरस्कार’ देण्यात आले. मुख्याध्यापक अरुण पगार आणि शिक्षक-कर्मचारी वृंदाने पाहुण्यांचे सन्मानचिन्ह आणि ग्रंथभेट देत स्वागत केले. सांस्कृतिक विभागप्रमुख कैलास लहांगे यांनी बक्षीसपात्र विद्यार्थी यादीवाचन केले. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.
