
वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी: पाटोळे (ता. सिन्नर) :
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महान क्रांतिकारक क्रांतिकारक उमाजी राजे नाईक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी उमाजी राजे नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यानंतर शाळेचे मुख्याध्यापक वसंत गोसावी यांनी उमाजी राजे नाईक यांच्या जीवनचरित्राची सविस्तर व प्रेरणादायी माहिती सांगितली. इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरुद्ध लढा उभारणारे, शोषितांचे रक्षण करणारे व भारतातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक म्हणून उमाजी राजे नाईक यांचे ऐतिहासिक योगदान त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी विद्यार्थ्यांना उमाजी राजे नाईक यांच्या धैर्य, देशप्रेम, स्वाभिमान व सामाजिक न्यायासाठी केलेल्या संघर्षाची ओळख करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्सुकतेने उमाजी राजे नाईक यांच्या जीवनाविषयी माहिती जाणून घेतली.
या निमित्ताने शाळेत “क्रांतिवीर उमाजी राजे नाईक जीवनचरित्र लेखन स्पर्धा” घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उमाजी राजे नाईक यांच्या जीवनकार्यावर आधारित माहितीपूर्ण व भावपूर्ण लेखन करून सहभाग नोंदवला. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल आवड निर्माण झाली.
या कार्यक्रमास कैलास पवार, मीना सोनवणे, प्रतिभा पवार, सुनिता खताळे आदी शिक्षकवृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना व क्रांतिकारकांचे विचार रुजवण्याचा उद्देश साध्य झाला.
