
सोनांबे (ता. सिन्नर) येथे आई भवानी वृक्षप्रेमी व सिध्दी साई दिंडी यांचे वतीने झालेल्या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेताना नागरिक
वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी: येथे आई भवानी वृक्षप्रेमी व सिद्धी साई दिंडी मुंबई यांचे वतीने
मोफत नेत्रतपासणी व चष्मे वाटप शिबिर नुकतेच संपन्न झाले. आई भवानी वृक्षप्रेमी बहुउद्देशीय संस्था ही संस्था स्थापन होऊन अवघे एक ते दीड वर्ष झाले असले तरी या अल्पावधीतच संस्थेने विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गावात व परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण हे या संस्थेचे प्रमुख कार्य असले तरी शालेय शिक्षण व सामाजिक जनजागृती यांसारखी कामे देखील वेळोवेळी केली जातात. याच सामाजिक बांधिलकीतून गावात मोफत नेत्रतपासणी शिबिराचे घेण्यात आले. या शिबिरात नेत्रतपासणी नंतर नागरिकांना चांगल्या दर्जाचे चष्मे मोफत देण्यात आले. सिद्धी साई दिंडी, मुंबई व आई भवानी वृक्षप्रेमी बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमाचा गावातील 290 नागरिकांनी लाभ घेतला. सिद्धी साई दिंडी ही दरवर्षी मुंबई ते शिर्डी अशी साई पालखी काढते. या पालखीत 700 ते 800 भाविक सहभागी होत असतात. सोनांबे परिसरातील जय भवानी लॉन्स येथे पालखीचा दुपारचा मुक्काम असतो. यावर्षी पालखी मुक्कामाच्या निमित्ताने सोनांबे गावात समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. आई भवानी वृक्षप्रेमी या शिबिराच्या यशस्वितेसाठी मुंबई येथील सिद्धी साई पालखीचे संस्थापक गणेश पालेकर, अध्यक्ष प्रसाद मांजरेकर, सरचिटणीस संतोष भेकरे, कोषाध्यक्ष विलास सावंत , कार्याध्यक्ष राजाराम कांदळगांवकर
तसेच आई भवानी वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष सोपान बोडके, सोमनाथ पवार, अनिल पवार, इब्राहिम शेख, विनोद रोकडे, समाधान बोडके, सागर पवार, गोविंद कडभाणे यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेच्या माध्यमातून भविष्यातही अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जातील असे यावेळी जाहीर करण्यात आले. प्रत्येक गावात अशा उपक्रमांची गरज आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त उपयुक्त सामाजिक उपक्रमांवर भर दिल्यास खऱ्या अर्थाने गावाचा विकास होईल अशी भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.
