
ओझर (प्रतिनिधी) ओझर मिग, ता.निफाड, जि.नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक मंडळ यांचे महाविद्यालय येथे मिशन ॲनिमिया मुक्त भारत अंतर्गत अरुणोदय सिकलसेल अभियान राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत महाविद्यालयातील युवक व युवतींसाठी सिकलसेल तपासणी तसेच हिमोग्लोबिन तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.या शिबिराचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी.लोखंडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच डॉ. डी. एस. बोराडे सर यांच्या सहकार्याने करण्यात आले. या वेळी एकूण 132 विद्यार्थ्यांची सिकलसेल व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. तपासणीबरोबरच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना समुपदेशन करून त्यांना सिकलसेल आजार व ॲनिमिया आजाराविषयी सविस्तर व योग्य आरोग्य शिक्षण देण्यात आले.
सिकलसेल आजार हा आनुवंशिक रक्तविकार असून यामध्ये लाल रक्तपेशींचा आकार बदलून त्या विळयाच्या आकाराच्या होतात. त्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन अशक्तपणा, वेदना, वारंवार आजारपण, संसर्गाचा धोका तसेच ॲनिमिया निर्माण होतो. वेळेवर तपासणी, योग्य समुपदेशन व आरोग्यविषयक मार्गदर्शन केल्यास या आजाराचे योग्य व्यवस्थापन करणे शक्य होते.हे शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर अंतर्गत उपकेंद्र ओझर–2 (सोनेवाडी) यांच्या वतीने यशस्वीरीत्या पार पडले. या वेळी डॉ. आनंद सुर्वे, आरोग्य सहाय्यक श्री राठी नाना, श्री देवरे नाना, प्रयोगशाळा अधिकारी श्रीमती पल्लवी कुलकर्णी, आरोग्य सेविका श्रीमती शीतल आवारे, श्रीमती प्रतिभा चौधरी, श्रीमती प्रियंका दवणे, तसेच आरोग्यसेवक श्री कांतीलाल झिरवाळ,श्री उमेश रामटेके श्री प्रशांत बिहाडे, श्री जयवंत पवार,व आशाताई ज्योती बोके आणि वर्षा बोके उपस्थित होते.महाविद्यालयीन युवक-युवतींमध्ये सिकलसेल व ॲनिमिया आजाराबाबत जागृती निर्माण करणे, लवकर निदान करणे आणि निरोगी पिढी घडविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून, या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
