
नांदगाव (प्रतिनिधी) नांदगाव येथील गंगाधर नाना आहेर प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि न्यायडोंगरी चे केंद्रप्रमुख तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य पदाधिकारी व नांदगाव तालुक्यात शिक्षकांचे आदर्श नेते आणि तालुक्यातील प्राथमिक शाळांचा सर्वांगीण विकास हे ध्येय बाळगणारे परळी येथील रहिवासी राजेंद्र नारायण पाटील (वय ५७वर्ष) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवारी 1 फेब्रुवारी रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास नाशिक येथे खाजगी रुग्णालयांमध्ये त्यांचे निधन झाले. दोन दिवसापूर्वी त्यांना हृदयविकाराचा त्रास होत होता त्यामुळे त्यांना नाशिक मधील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते त्यांच्या निधनामुळे नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांमधला एक आदर्श नेता हरपला त्यामुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. राजेंद्र पाटील साधारणपणे 37 वर्षापासून प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत होते तालुक्यात एक आदर्श शिक्षक विद्यार्थी प्रिय शिक्षक आणि शाळेच्या विकासासाठी झपाटून टाकणारा एक व्यक्तिमत्व होते. त्यांनी चांदोरे येथील प्राथमिक शाळा डिजिटल शाळा म्हणून तालुक्यात आदर्श शाळा निर्माण केली होती. ते तालुक्यातील अनेक संघटनांची व सामाजिक सहकारी क्षेत्रात त्यांचा एक वेगळा आदर्श होता. त्यांच्यामध्ये सर्व सहकाऱ्यांना मदत करण्याची भावना होती त्यामुळे ते नांदगाव तालुक्यातील शिक्षकांचे आदर्श नेते होते. त्यांच्या दुःखद निधनामुळे तालुक्यातील शिक्षकांवर दुःखाची छाया पसरली आहे. शिक्षक संघाचे माजी राज्याध्यक्ष संभाजीराव थोरात, माजी आमदार अनिल आहेर, आमदार सुहास अण्णा कांदे,यांचे निकटवर्तीय म्हणून ते परिचित होते. प्राथमिक शिक्षक विलास पाटील व संजय पाटील यांचे ते बंधू तर अभिषेक पाटील यांचे ते वडिल होते.त्यांचा अंत्यसंस्कार त्यांच्या मुळ गावी परधाडी येथे दुपारी एक वाजता करण्यात येणार आहे.
