
नाशिक-(वार्ताहर ) – मराठी भाषेच्या संवर्धन व संवर्धनासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये शुद्ध, सुबक आणि प्रभावी लेखनाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, नाशिक विविध उपक्रमांचे आयोजन करीत असते. रविवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी नाशिक नविन नाशिकमधील नाशिक एज्युकेशन संस्थेच्या पेठे विद्यालयामध्ये बालकुमार संस्था आणि अक्षरकौशल्य कोचिंग इन्स्टिट्यूट,नाशिक यांच्यावतीने मराठी राजभाषा हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मराठी भाषेतील सौंदर्य, शिस्तबद्ध लेखनशैली आणि हस्ताक्षरातील सौष्ठव यांचा गौरव केला जाणार आहे. नाशिक शहरातील विविध शाळांमधील इयत्ता चौथी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली असून, मराठी भाषेच्या अभिमानाला चालना देणारा हा उपक्रम ठरणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना सुंदर हस्ताक्षर, शब्दांची मांडणी, अक्षरांची स्पष्टता व एकूण सादरीकरण या निकषांवर गुणांकन करण्यात येईल. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. मराठी ही केवळ भाषा नसून आपली ओळख, आपली संस्कृती आणि आपला स्वाभिमान आहे. त्या मराठीचा सन्मान जपण्यासाठी व पुढील पिढीत लेखनकौशल्य रुजवण्यासाठी ही स्पर्धा निश्चितच प्रेरणादायी ठरेल. असे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष सुभाष सबनीस आणि अक्षरकौशल्य कोचिंग इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा.वैशाली फळे यांनी कळविले आहे.
या स्पर्धा दोन गटात होणार असुन छोटा गट चौथी ते सहावी आणि मोठा गट सातवी ते नववी असा असेल. या स्पर्धांसाठी आयोजकांच्यावतीने कागद दिला जाणार असुन दिलेल्या स्पर्धापत्रकावर निळ्या शाई असलेल्या जेलपेनच्या सहाय्यानेच आपल्याला हस्ताक्षर काढायचे आहे. जेलपेन प्रत्येक विद्यार्थ्याने सोबत घेवुन यायचा आहे. प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. दोन्ही गटांमधून प्रथम, द्वितिय, तृतिय आणि एक उत्तेजनार्थ असे चार पारितोषिके देण्यात येतील. विजेत्यांना प्रशस्तीपत्र आणि स्मृतीचिन्ह देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपली मराठी भाषेवरील श्रध्दा व्यक्त केली म्हणून आयोजकांच्यावतीने प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला एक विशेष भेट देण्यात येणार आहे. या स्पर्धा रविवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा वाजता सुरु होतील. स्पर्धकांना आपले हस्ताक्षर कौशल्य दाखविण्यासाठी पंधरा मिनिटांचा वेळ देण्यात येईल. त्यानंतर परिक्षक आपल्या हस्ताक्षराचे परिक्षण करतील आणि अकरा वाजता पारितोषिकांचे वितरण होणार आहे. सदरची स्पर्धा आणि पारितोषिक वितरण समारंभ दोन तासांमध्ये संपेल. स्पर्धेच्या ठिकाणी स्पर्धकांना आणण्यानेण्याची व्यवस्था पालकांनी करावयाची आहे. पिण्यासाठी पाणी आणि पोटपुजेसाठी लागणारे साहित्य स्पर्धकांनी आणावयाचे आहे. आयोजकांच्यावतीने खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाणार नाही. स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी ९९७०१५८००४ या नंबरवर संपर्क करावा.नाशिक शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन सुभाष सबनीस, प्रा.वैशाली फळे,स्मिता बनकर, दिगंबर काकड, नंदकिशोर ठोंबरे, आरती डिंगोरे यांनी केले आहे.
