
लेखक- डॉ. ठकसेन गोराणे,
राज्य प्रधान सचिव महाराष्ट्र अंनिस.
सण- समारंभ, उत्सव हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातील ताणतणाव सैल व्हावेत, सामाजिक एकोपा , स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा, सर्वांना आनंद मिळावा, मनोरंजन घडावे अशा अनेक चांगल्या गोष्टींसाठी सण- समारंभ – उत्सव साजरे करणे आवश्यकही आहे.
परंतु अलीकडच्या काळात सण, समारंभ, उत्सव साजरे करण्याचे मुख्य उद्देश,हेतू बाजूला पडून अनेक सण ,उत्सव समारंभ यांना केवळ दिखाऊपणाचे स्वरूप व प्रचंड उधाण आल्याचे दिसते. त्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे शोषण, गैरव्यवहार, अपघात, गैरप्रकार ,सामाजिक-धार्मिक तेढ, पर्यावरणाच्या प्रदूषणात प्रचंड प्रमाणात वाढ, वेळ, श्रम, पैसा यांचा अनाठायी अपव्यय, अनारोग्य ,कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न अशा अनेक समस्या, अडचणी,संकटं निर्माण होताना दिसतात.
महाराष्ट्राच्या ग्रामीण- आदिवासी भागात अनेक गावांमध्ये ग्रामदैवतांच्या जत्रा – यात्रांचे आयोजन केले जाते.
साधारण वीस वर्षांपूर्वी अशा जत्रा यात्रां ह्या मनोरंजन, कलाकुसरींचे सादरीकरण, कष्टमय जीवनाला थोडासा विश्राम, विरंगुळा, गाठीभेटी अशा अनेक इष्ट उद्देशाने भरत असत.
काही गावांमधून तर वर्षभरात एकाच गावात टप्प्याटप्प्याने दोन दोन ग्रामदैवतांच्या जत्रा आजही भरतात.
प्रत्यक्षात, अशा अनेक जत्रांयात्रांमधून परंपरा पालनाचा आणि धर्माचरणाचा भाग म्हणून अनेक कालबाह्य, अशास्त्रीय अनिष्ट, अघोरी ,अमानुष रूढीं, प्रथां जतन करून त्या जशाच्या तशा आजही जतन करून, जोपासल्या जातात, असे दिसते.
अनेक जत्रां – यात्रां मधून नवसापूर्ती म्हणून प्राण्यांचे बळी देण्यात येतात. जत्रेच्या निमित्ताने इतर सांस्कृतिक कार्यक्रम भलेही ठिकठिकाणी वेगवेगळे होत असतील. परंतु त्या सर्वांमध्ये एक समान धागा आढळतो. तो म्हणजे देव- देवतांचे नवस फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणात उघड्यावर पशूपक्षीबळी देण्याची अनिष्ट व अघोरी प्रथा!
अशा जत्रांमध्ये आपण प्रत्यक्षात फेरफटका मारला तर आपल्या नजरेस पडते की,तेथे प्रचंड प्रमाणात उघड्यावर नवसपूर्ती म्हणून पशूबळी देण्याचे काम चालू असते.
त्यामुळे तेथे कमालीची अस्वच्छता व दुर्गंधी पसरलेली असते. तेथेच मांस शिजवून, जेवणावळी उठत असतात . काही ठिकाणी देव-देवतांची नवसपूर्ती म्हणून दंडवत, लोटांगण घालणे, लोखंडी हूक चेहऱ्यावर, पोटाच्या , पाठीच्या त्वचेला टोचून घेऊन गळ खेळण्याचे क्रूर व अघोरी प्रकार चालू असतात. आजूबाजूला प्रचंड कोलाहल चालू असतो. यात काही चुकीचे आहे, गैर आहे असे कुणालाही वाटत नाही.
सर्व अगदी सुखेनैव चालू असते.
विशेष म्हणजे हे जसे हिंदूंच्या देवदैवतांच्या नवसपूर्तीच्या बाबतीत घडते, तसेच मुस्लिमांच्या अनेक दर्ग्यांवर, पिराच्या ठिकाणीही मन्नत पूर्ती म्हणून पशूबळी दिले जातात.
नवसापोटी उघड्यावर पशूबळी देण्यामध्ये केवळ अशिक्षितच असतात, असे नव्हे तर शिक्षित भाविकही मोठ्या प्रमाणात मनोभावे सहभागी होताना दिसतात.
शिक्षण व्यवस्थेत असलेले वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य शिक्षणातून व्यक्तीच्या आचरणात येईल, विकसित होईल आणि त्यामुळे तो अंधश्रद्धेचा, अवैज्ञानिक गोष्टींचा बळी होणार नाही ,अशी अपेक्षा होती. मात्र येथे शिक्षणाचा पराभव झाल्याचे स्पष्टपणे जाणवते.
शिकलेला माणूस आहार, व्यायाम, आरोग्य, तंत्र, वैज्ञानिक कौशल्याचे ज्ञान वापरण्यासाठी माहिती ,ज्ञान व शास्त्रीय विचार पद्धती यांचा वापर करतो. मात्र महत्त्वाच्या बाबींमध्ये यशस्वी होण्यासाठी किंवा सफल होण्यासाठी आजही अनेक वेळा तो पारंपरिकतेचाच मार्ग शोधतो .
त्यासाठी तो जपजाप्य, होमहवन, ताईतोडगे, पूजाअर्चा,नमाज, प्रार्थना ,यज्ञयाग , गंडेदोरे ,उपासतपास, नवससायास असं सर्व यथासांगपणे पार पाडतो.
जत्रेच्या ठिकाणी नवसपूर्ती करणाऱ्या शिक्षित भाविकांमध्ये असे दिसून येते की ते व्यवहारात यशस्वी होण्यासाठी शास्त्रीय विचार पद्धती वापरतात .
पण वैज्ञानिक दृष्टिकोनाला संपूर्ण फाटा देतात.
कारण शास्त्रीय विचार पद्धती ही एक गणिती प्रक्रिया आहे. तिच्या वापराने व्यवहारात अशी माणसे यशस्वी होतात.पण वैज्ञानिक दृष्टिकोन ही त्याच्या पुढची पायरी असून त्यात जीवन मूल्यांचा ,मूल्यांशयांचा विचार समाविष्ट असतो. हेच अनेक शिक्षित व्यक्तींना कळालेले किंवा उमगलेले नसते. त्यामुळे कितीही शिकले तरी परंपरेचाच मार्ग ते अनेक वेळा अनुसरतात.
अशावेळी नवस करू नका आणि उघड्यावर पशुळबळी देऊ नका, असे बोलणे ही बाब फारशी कुणाला रुचत नाही आणि पटतही नाही.
उलट तीव्र विरोधच केला जातो . अशा वेळी हिंदू- मुस्लिम असे सर्वजण ,विशेषतः आर्थिक हितसंबंधी एकत्र येऊन प्रबोधन करणाऱ्या कार्यकर्त्यांना एकजुटीने विरोध करतात.
देवदैवतांच्या श्रद्धेपोटी आणि नवसपूर्ती करण्यासाठी लांबून, लांबून भगत ,भाविक आलेले असतात. त्यातील अनेक जण स्वतःचे किंवा भाड्याचे वाहन घेऊन त्यासोबत बकरं, मेंढरू, कोंबडं घेऊन आलेले असतात. दहा- वीस नातेवाईक, मित्रमंडळी यांनाही ,त्यांनी सोबत आणलेले असते. हे सर्वजण परंपरा जपणारे, जोपासणारे, मानणारे ,मिरवणारे असतात.
जत्रा ,यात्रेच्या ठिकाणी विस्तीर्ण माळावर किंवा जत्रेचे ठिकाण गावात असेल तर गल्ली बोळात,जिथे जागा दिसेल तिथे, घाणीवर माती- केरकचरा ढकलून, पुढचा कार्यक्रम सुरू करतात. अशावेळी ह्या लोकसमुदायाला समजावणे, प्रबोधित करणे, अतिशय अवघड होऊन बसते.
तरीही महाराष्ट्र अंनिसने महाराष्ट्रातील पशूबळीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या अशा अनेक जत्रांयात्रांमधील लोकांचा, भाविकांचा रोष पत्करून प्रबोधन ,सत्याग्रह आणि प्रसंगी प्रचंड संघर्ष करून, हे नवसपूर्ती म्हणून दिल्या जाणाऱ्या पशूबळींचे प्रमाण घटविण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आजपर्यंत दीडशेहून अधिक जत्रायात्रां मधील पशूबळीची अनिष्ट ,अघोरी प्रथा संपूर्णपणे थांबविण्यात अंनिसला यश मिळालेले आहे.
शिवाय सातत्यपूर्ण प्रबोधनामुळे या अनिष्ट, अघोरी प्रथेबाबत जनसामान्यांच्या मनात मोठ्या प्रमाणात जनजागृती निर्माण झालेली आहे. त्यामुळे अनेक जत्रायात्रांतील नवसापोटी उघड्यावर दिल्या जाणाऱ्या पशूबळींची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.
मात्र अजूनही नवस करण्याचे प्रमाण आणि त्यासाठी उघड्यावर पशूबळी देण्याचे प्रमाण संपूर्णपणे थांबलेले नाही.
जवळजवळ सर्वच ठिकाणी याबाबतचा न्यायालयाचा आदेश, कायदा धाब्यावर बसवून, उघड्यावर पशूबळी दिले जातात. याबाबत दरवर्षी जत्रा- यात्रां मधून तसेच इतर वेळीही लोकसंवाद, व्याख्याने, प्रबोधनपर कार्यक्रम अंनिस आयोजित करीत असते. काही देव- देवतांची नवसपूर्ती म्हणून विशेषतः महिला, मुली भर उन्हात, अस्वच्छ अशा सार्वजनिक रस्त्यावर गटागटाने लोटांगण , दंडवत घालणे, गळ खेळणे असे प्रकार करीत असतात. महिला आणि मुलींना असे लांच्छनास्पद प्रकार करण्यासाठी जे भोंदू ,भगत उद्युक्त करतात, त्यांना मात्र याचे काहीही सोयरंसुतक नसते. मात्र हे सर्व अपप्रकार पाहून सुज्ञ माणसाची मान शरमेने खाली गेल्याशिवाय राहत नाही.
जेव्हा अशा सर्व अनिष्ट ,अघोरी कालबाह्य झालेल्या प्रथा, परंपराविरोधात कार्यकर्ते प्रबोधन, सत्याग्रह संघर्षासाठी उभे राहतात. तेव्हा त्यांच्यावर अनेक आरोप होतात. तुमचं कोण ऐकणार ? आमची प्रथा, परंपरा आहे , आम्ही ती पाळतो ,जोपासतो. तुम्ही कोण आम्हाला सांगणार ? तुम्हाला आम्हीच दिसतो का ? आमचाच धर्म दिसतो का ? संत गाडगेबाबांना जिथे गुडघे टेकावे लागले, तिथे तुम्ही कोण लागून गेलात? देवाच्या कामाला तुम्ही असा विरोध केला तर तुम्हाला लवकरच त्याचे परिणाम भोगायला लागतील. तुम्ही जगणारच नाहीत, असं बरंच काही प्रत्यक्ष प्रबोधन कार्यक्रमांच्या वेळी कार्यकर्त्यांना ऐकावे लागते .
अशा जत्रां – यात्रांमध्ये ह्या सर्व अनिष्ट, अघोरी, अमानुष प्रथा , परंपरा चालू ठेवण्यात ज्यांचे खास करून आर्थिक हितसंबंध गुंतलेले असतात ,ते ऐन प्रबोधनाच्या दिवशी येऊन कार्यकर्त्यांना दमबाजी करणे ,शिविगाळ करणे, धमक्या देणे, देवाची भीती दाखवणे, लोटालोटी करून कार्यक्रम बंद पाडण्याचा, उधळून लावण्याचा प्रयत्न करणे, असे चुकीचे वर्तन सर्रास करतात.
मात्र कोणी कितीही सांगितले तरी देवाधर्माच्या नावाने नवस बोलून अतिशय क्रूर पद्धतीने ,गलिच्छ ठिकाणी उघड्यावर केली जाणारी पशूहत्त्या हा कोणत्याही धर्माचरणाचा, धर्मपालनाचा, परंपरा जतन करण्याचा आणि जोपासण्याचा भाग होऊच शकत नाही. ज्याला आधुनिक, सुसंस्कृत समाज आपण म्हणू, त्यात अशा अवैज्ञानिक, कालबाह्य, अनिष्ट, अघोरी ,अमानुष प्रथां- परंपरां व कर्मकांडांना थारा कसा असेल ?
नवसे कन्या- पुत्र होती । तरी का करणे लागे पती ?
असा खडा सवाल संत तुकाराम महाराज यांनी चारशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या समाजाला विचारलेला आहे. महाराष्ट्र अंनिस अशा संत वचनांचीच आठवण समाजाला, भाविक -भक्तांना प्रबोधनातून करून देत असते. सामान्य भाविकांना हा मुद्दा,विचार पटतोही.
पण तथाकथित भगत मंडळीं आणि अशा अनिष्ट, अघोरी प्रथा परंपरा चालू ठेवण्यात आणि त्यांचे उदात्तीकरण करण्यात ज्यांचा फायदा, विशेषता आर्थिक हितसंबंध अडकलेले असतात त्यांचा, प्रबोधन, सत्याग्रहाला कडाडून विरोध असतो. त्यांना संत – विचार, संत -वचनं, लोकांचे आरोग्य, कायदा याच्याशी काही देणे-घेणे नसते.
दिनांक २३ जुलै, १९९८ रोजी महाराष्ट्र शासनाने मा. उच्च न्यायालयात प्रतिपादन केले आहे की, देवाच्या नावाने पशू व पक्षी यांची होणारी हत्त्या थांबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अशा हत्त्या रोखण्यासाठी सर्व प्रकारची काळजी घेतली जाईल व योग्य ती पावले उचलले जातील.
या युक्तीवादावर समाधान व्यक्त करून तसा लेखी आदेश न्यायालयाने काढला .
परंतु १९९८ पासून आजपर्यंत महाराष्ट्र अंनिसने महाराष्ट्रातील त्या त्या जिल्हा व पोलीस प्रशासनाला वारंवार विनंती करूनही, महाराष्ट्रातील पशूबळीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या एकाही जत्रा-यात्रेत न्यायालयाच्या या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी झालेली नाही. जत्रेतील नवसापोटी उघड्यावर होणारी पशूहत्त्या थांबविण्यासाठी पोलिसांनी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा करणं हे आता विनोद करण्यासारखेच झाले आहे.
महाराष्ट्रात दरवर्षी लहानमोठ्या अशा सरासरी चार ते पाच हजार जत्रांयात्रां भरतात.
असे समजूया की, त्यापैकी केवळ दोन हजार जत्रां – यात्रां मधून पशूपक्षी बळी देऊन, नवस फेडले जातात. नवसपूर्ती म्हणून एका पशुबळीची जत्रा करण्यासाठी आजच्या महागाईनुसार किमान पंधरा हजार रुपये खर्च येतो . प्रत्येक जत्रेतून सरासरी एक हजार प्राण्यांचे बळी दिले जातात , असे गृहीत धरले तर, दोन हजार जत्रांमध्ये वीस लाख पशुबळी दिले जातात. म्हणजे महाराष्ट्रातील ग्रामीण-आदिवासी भागातून दरवर्षी किमान तीन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम या अनिष्ट आणि अघोरी प्रथेपायी खर्च होते. त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित मोठ्या प्रमाणात कोलमडते. अर्थव्यवस्था खिळखिळी होते. नवसापोटी पशुहत्या यामागील हे अर्थकारण ग्रामीण भागाला दिवाळखोरीकडे नेणाऱे आहे, एवढे मात्र नक्की !
खरंतर आपल्याकडे अशा प्रकारे दैवीउपचार, परंपरांचे पालन, धर्माचरण, नवसायास, जत्रा- यात्रा यांची पूर्तता करण्यासाठी आर्थिक ऐपत नसतानाही जो खर्च केला जातो, त्यामुळे बहुसंख्य लोक कायमचे कर्जबाजारी होतात.
प्रत्यक्ष जत्रेत शोध घेतला तर एका जत्रेसाठी घेतलेले कर्ज पुढील जत्रेपर्यंत फिटू शकत नाही, अशी अनेक कुटुंबं, अशा जत्रांमधून आपणास पाहायला मिळतात. शिवाय पुन्हा वर्षभरात एखाद्या संकटातून निभावण्यासाठी किंवा लाभालोभापोटी पुन्हा दुसरा नवस केलेलाच असतो. त्याचीही पूर्ती करायची असते. पुन्हा त्यासाठी कर्ज काढणे भाग पडते .अशा दुष्टचक्रात अनेक कुटुंबे आजही अडकलेली आहेत.
अशा जत्रां-यात्रां मध्ये नवसफेडीपोटी भाविकांकडून देवाच्या भीतीपोटी किंवा भगताच्या सांगण्यावरून बळजबरीने पशूपक्षी बळी करून घेण्यात आणि ते चालू ठेवण्यात ज्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात, त्यांचाच मोठा आर्थिक फायदा होत असतो.
लोकांच्या देवभोळेपणाचा आणि धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेऊन भाविक -भक्तांना अशा कालबाह्य, अनिष्ट, अघोरी, रूढीं- प्रथां आचरणास भाग पाडून, भीती दाखवून त्यांना अधिक गरिबीत आणि मानसिक गुलामगिरी ढकलण्याचे, कायम गरीबीत ठेवण्याचे हे कुटील कारस्थान आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
अज्ञानातून ,अंधश्रद्धेतून अनाठाई खर्च होणारी हीच रक्कम जर कुटुंबाच्या आरोग्यासाठी तसेच शिक्षण,शेती विकासासाठी आणि अशाच इतर आवश्यक बाबींसाठी खर्च केली, झाली तर अशा कुटुंबांची निश्चितच विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. किमान अशा अंधश्रद्धायुक्त बाबींसाठी खर्च करून, कर्जबाजारीपणा वाढणार नाही.
शिवाय समाज स्वास्थ्यही शाबूत राहील.
खरंतर अशा अनेक जत्रांयात्रांमधून बळी दिल्या जाणाऱ्या प्राण्यांची वैद्यकीय तपासणी केलेली नसते. ती करायची असते , हेच माहीत नसते.
त्यामुळे जत्रा झाल्यानंतर आजारपणाचेही प्रमाण वाढते.
शिवाय मांसाहार आला म्हणजे त्याबरोबर मद्यपान करण्यास अनेक ठिकाणी समाज मान्यताही मिळते. त्याला तरुण पिढी बळी पडण्याची शक्यता अधिक वाढते.
म्हणून कुटुंबात , समाजात असे सर्व बाजूंनी संकटं, अडचणी, समस्या घेऊन येणाऱ्या अशा जत्रां- यात्रांचे स्वरूप गावकऱ्यांनी , भाविक भक्तांनी ठरवले तर नक्कीच बदलू शकते.
अभिनव ,आशादायी, उत्साहवर्धक व कालसुसंगत अशाप्रकारे जत्रायात्रांचे आयोजन करता येऊ शकते.
तसे ते जरूर करावे . त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मनोरंजनाचे, संस्कृती संवर्धनाचे, विविध प्रकारच्या स्थानिक समस्या निवारणाचे,असे अनेक उत्सव, कार्यक्रम, उपक्रम सादर करता येतील. त्या दिशेने अशा जत्रायात्रांची वाटचाल सुरू होणे आवश्यक आहे .
समाजधुरीणांनी जाणिवपूर्वक पुढे येऊन असा विचार समाजात रुजवायला हवा. संघटितपणे आणि
कृतिशीलपणे तसे प्रयत्न करायला हवेत..
