
“हळदी कुंकू, व सन्मान नारी शक्तीचा
“ज्ञानातून उजळे तलवारीची पात चला दाखवूया महिलांना शिक्षणाची वाट ” मुलींना समजू नका भार त्याच तर आहे खऱ्या जीवनाचा आधार ही संकल्पना मनात ठेवून या संकल्पनेतून महिलांना केवळ भार न समजता, खऱ्या अर्थाने जीवनाचा आधार मानत त्यांच्या सन्मानासाठी व सक्षमीकरणासाठी फाउंडेशन तर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत.

नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्ष स्नेहल देव यांच्या पुढाकाराने ग्रामीण भागातील महिलांना शिक्षणाचे महत्त्व, तसेच शिक्षणातून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी यांची माहिती देण्यासाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नमस्ते नाशिक फाउंडेशन, नाशिक यांच्या वतीने कुशेगाव, तालुका इगतपुरी येथे आयोजित “सौभाग्याचे लेणी” हा हळदीकुंकू समारंभ अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमाला परिसरातील जवळपास २०० हून अधिक महिलांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अरुण शिनकर (निवृत्त डेअरी मॅनेजर, डेअरी डेव्हलपमेंट डिपार्टमेंट) व मुरलीधर सरनाईक (वीज निर्मिती, विद्युत मंडळ) यांच्या हस्ते गावातील होतकरू महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये वंदना सोनवणे, विमलबाई प्रभाकर सोनवणे, अंबाबाई मेंगाळ, दीक्षा सोनवणे, लिलाबाई सोनवणे व चिऊबाई आगविले यांचा समावेश होता. तसेच ग्रामपंचायत सदस्य वंदना सोनवणे व चिऊबाई आगविले यांचा बक्षीस देऊन विशेष सत्कार करण्यात आला. नमस्ते नासिक फाउंडेशनचे अध्यक्ष स्नेहल देव यांच्यातर्फे कुशेगाव येथील तरुण मनोज सोनवणे यांची सीआरपीएफ मध्ये निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला, यानंतर नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्ष स्नेहल देव यांनी महिलांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व, शिक्षणातून मिळणारे रोजगार व त्याचे दीर्घकालीन फायदे याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी महिलांसाठी हास्ययोगाचे प्रात्यक्षिक घेतले व सांगितले की, दररोज किमान ४५ मिनिटे व्यायाम केल्यास शरीर निरोगी राहते आणि मन सदैव आनंदी राहते. स्नेहल देव फ्रेंड सर्कलच्या सीमा सरनाईक, कविता राणे, मंजिरी घन, गायत्री पारिख, सोनाली देव, लता शिनकर, ज्योती अमृतकर अलका देव प्रतिभा बनाईत आदी महिलांच्या हस्ते गावातील सर्व महिलांना हळदीकुंकूचे वाण देण्यात आले. कार्यक्रमास शंकरजी सोनवणे पोलीस पाटील एकनाथ कातोरे सरपंच देविदास सोनवणे, आदी मान्यवर उपस्थित होते. अमेरिका स्थित सॉफ्टवेअर तज्ञ स्वप्निल शिनकर व अभियंता किशोर सरनाईक यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष स्नेहल देव यांनी महिलांना व मुलींना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगत, “आपण स्वतः शिकू आणि भावी पिढीलाही शिकवू” असा संकल्प सर्व महिलांकडून करून घेतला.
