
पाटोळे (ता. सिन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हुतात्मा दिनानिमित्त अत्यंत शिस्तबद्ध व भावपूर्ण वातावरणात शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक वसंत गोसावी यांनी ३० जानेवारी हुतात्मा दिनाचे ऐतिहासिक महत्त्व सांगत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसा, सत्य आणि त्यागाच्या विचारांवर प्रकाश टाकला. गांधीजींच्या बलिदानातून मिळालेल्या मूल्यांचा अवलंब विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात करावा, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमास माजी सरपंच मेघराज आव्हाड, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर भोर, माजी सरपंच सुनिल सांगळे, सोमनाथ कराड, सुनिल बुरकुल, तसेच शाळेतील शिक्षकवृंद कैलास पवार, मीना सोनवणे, स्वाती खताळे, सुनिता खताळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शहिदांविषयी आदर आणि राष्ट्रीय मूल्यांची जाणीव निर्माण झाली. शांतता व सद्भावनेचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
