
प्रतिनिधी : अरुण भोई
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमात बदल जाहीर केला आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांच्या तारखांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.आधी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार होते. मात्र आता हे मतदान ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे ७ फेब्रुवारीला होणारी मतमोजणी आता ९ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.राज्य निवडणूक आयोगाने १३ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्रांची छाननी, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, निवडणूक चिन्हांचे वाटप तसेच अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.आता केवळ मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत. निवडणूक कार्यक्रमात झालेल्या बदलामुळे प्रशासनासह उमेदवार व मतदारांनी नव्या तारखांची नोंद घ्यावी, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.
