
जळगाव निंबायती (वार्ताहर) – येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताकदिनी राष्ट्रभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायती करण्यात आल्या संस्थेचे विशस्त लक्ष्मण पाटील यांनी ध्वजपुजन केले तर संजय काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच स्काउट गाइडचे ध्वजारोहण जेष्ठ प्रा. पी. जी. माने यांच्या हस्ते झाले. संस्थेच्या अध्यक्षा कासूताई पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

प्रारंभी विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढून देशभक्तिपर घोषणा दिल्या. विद्यालयाच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या राष्ट्रभक्तिपर गीतांना, समूह नृत्यांना, नाटीका, स्काऊट गाईडचे संचलन तसेच मानवी मनोरे यांना उपस्थितांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. प्रसंगी ३ ते २६ जानेवारी सावित्रीबाई फुले महिला सक्षमीकरण अभियानात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रा. डी. एस. जमधाडे यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले. तसेच साक्षरतेची शपथ दिली. प्रास्ताविक प्रा. अमोल अहिरे यांनी केले.

सूत्रसंचालन प्रा. सी. डी. राजपूत यांनी केले. यावेळी संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे यांसह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह बहुसंख्येने विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. खाऊ वाटपाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
