
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक संचालित मातोश्री चं. व अ. चांडक कन्या विद्यालयात प्रजासत्ताकदिनाचा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मुख्याध्यापिका सुनिता कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हवालदार कैलास भालेराव, हवालदार दत्तू गडाख, शालेय समिती अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीराम क्षत्रिय, चित्रा क्षत्रिय तसेच शिक्षक प्रतिनिधी उत्तम भोये उपस्थित होते.

यावेळी मुख्याध्यापिका सुनिता कर्डिले यांनी तिरंग्याचे महत्त्व विशद करत विद्यार्थिनींनी राष्ट्रप्रेम, स्वच्छता व पर्यावरण रक्षणाची जाणीव ठेवून जबाबदार नागरिक म्हणून घडावे, असा संदेश दिला. हवालदार कैलास भालेराव यांनी संविधानाचे महत्त्व व सैनिक जीवनातील अनुभव कथन केले, तर हवालदार दत्तू गडाख यांनी जिद्द, चिकाटी व मेहनतीचे महत्त्व विद्यार्थिनींना पटवून दिले.

प्रजासत्ताकदिनानिमित्त शिक्षिका प्रिया कुलकर्णी यांनी कॉपीमुक्त अभियानाची शपथ दिली. यावेळी ‘ज्ञानयात्री’ या शालेय त्रैमासिकाचे प्रकाशन तसेच गुणवंत विद्यार्थिनी व पालकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमात श्रद्धा गाढवे व आदिती सावंत यांनी प्रभावी भाषणे केली. सिद्धी गायकवाड हिने सादर केलेले देशभक्तीपर गीत, मनस्विनी पेटकर हिचे नृत्य तसेच गाईड विद्यार्थिनींचे शिस्तबद्ध संचलन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ‘ उठा राष्ट्रवीर हो’ या जोशपूर्ण देशभक्तीपर गीताने व राष्ट्रघोषणांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सूत्रसंचालन तृषाली बोडके व राजहंस माळी यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक व नागरिक उपस्थित होते.
