
सिन्नर : संक्रांत सणाचे औचित्य साधून मातोश्री चंद्रभागाबाई व अयोध्याबाई चांडक कन्या विद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त माता-पालकांसाठी “स्त्रीचे मानसिक व शारीरिक आरोग्य” या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर प्रसिद्ध आयुर्वेदिक चिकित्सक डॉ. प्राजक्ता कुलकर्णी यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता कर्डिले यांनी प्रास्ताविक सादर करून कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले. संयुक्ता कुलकर्णी यांनी डॉ. प्राजक्ता कुलकर्णी यांचा सविस्तर परिचय करून दिला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नीलिमा दुसाने यांनी अत्यंत प्रभावी आणि संयत शैलीत केले.

व्याख्यानात डॉ. कुलकर्णी यांनी स्त्रीच्या आयुष्यातील विविध टप्प्यांमध्ये होणारे शारीरिक बदल, मानसिक ताणतणाव, कुटुंब व समाजातील भूमिका, कामाचा ताण तसेच बदलती जीवनशैली यांचा आरोग्यावर होणारा परिणाम अत्यंत प्रभावी व समजेल अशा भाषेत स्पष्ट केला. स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग-प्राणायाम, ध्यान, सकारात्मक विचारसरणी आणि आयुर्वेदिक दिनचर्या यांचा अवलंब करणे किती आवश्यक आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला.
तसेच आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आधीच प्रतिबंधात्मक उपाय करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. किशोरवयीन मुली, गृहिणी, नोकरदार महिला तसेच वृद्ध महिलांसाठी उपयुक्त अशा आयुर्वेदिक सल्ल्यांनी उपस्थित महिलांना आरोग्याबाबत नवी दृष्टी मिळाली.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित माता-पालकांनी मनमोकळेपणाने विविध प्रश्न विचारले. हार्मोनल असंतुलन, ताणतणाव, निद्रानाश, वजनवाढ, थकवा, पाळीविषयक समस्या अशा अनेक विषयांवर डॉ. कुलकर्णी यांनी संयमाने, सुस्पष्ट आणि तज्ज्ञतेने मार्गदर्शन केले. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ व्याख्यान न राहता एक सुसंवादात्मक व समुपदेशनपर सत्र ठरला.
विद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा, स्त्री सशक्तीकरणाला चालना देणारा आणि माता-पालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला. माता पालकांनी शाळेने दिलेल्या आरोग्यदायी विचारांच्या वानाचे मनस्वी कौतुक केले. भविष्यातही अशा प्रकारचे आरोग्यविषयक उपक्रम नियमितपणे आयोजित व्हावेत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
