
जातेगाव: (प्रतिनिधी) भारतीय प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, जातेगाव येथे अत्यंत उत्साहात आणि देशप्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे परिसरातील सैन्यदलात कार्यरत असलेले आणि सेवानिवृत्त झालेले वीरपुत्र, ज्यांच्या उपस्थितीने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीचे नवे चैतन्य पाहायला मिळाले.विद्यालयाचे उपशिक्षक श्री. मराठे एस.एम. यांनी सर्वांचे स्वागत केले, तर प्राचार्य श्री. धुळे पी.के. यांनी प्रास्ताविकातून संविधानाचे महत्त्व मांडले. कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साहात झाली.
राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण माध्यमिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. गोटूभाऊ गोपीनाथ निकम यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष श्री. जयवंतराव यादवराव चव्हाण व ५ वी ते ८ वी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. चंद्रभान पांडुरंग झोडगे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे पूजन करून मानवंदना देण्यात आली.
याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, जि.प. व पं.स. सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांचा सन्मान करण्यात आला.शालेय प्रांगणात ध्वजारोहणानंतर वैचारिक जनजागृती करण्यात आली. विद्यालयाचे उपशिक्षक श्री. अहिरे एस.डी. यांनी उपस्थितांना संविधान वाचनासह साक्षरतेची शपथ दिली. लोकशाहीची मूल्ये रुजवण्यासाठी आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.कार्यक्रमात सांस्कृतिक रंगाची उधळण पाहायला मिळाली. विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतांवर बहारदार नृत्य सादर केले. त्यांच्या या सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले आणि परिसरातून टाळ्यांचा कडकडाट झाला. जातेगाव ग्रामपंचायत परिसरातून विद्यार्थ्यांची भव्य प्रभातफेरी काढण्यात आली. “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम” च्या घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते. ग्रामस्थांनीही या प्रभातफेरीचे ठिकठिकाणी स्वागत केले.क्रीडा शिक्षक श्री. बच्छाव सर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
