
रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिन
या दिवसाचे महत्व वाढवण्यासाठी विविध संस्था या सामुदायिक सूर्यनमस्कार साधनेचे आयोजन करत असतात. योगदर्शन योग केंद्र सामाजिक, शैक्षणिक, सेवाभावी संस्था व श्री तुळजाभवानी मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने रविवार दिनांक 25 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता श्री तुळजाभवानी मंदिर जय भवानी रोड येथे सामूहिक योग साधनेचे आयोजन करण्यात आले होते. सूर्यनारायण देवतेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. वैदिक काळापासून व ऋषीमूनी, गुरु शिष्य परंपरेतून सूर्यनमस्कार आला आहे, पूर्वी घरातील स्ञी, पुरुष स्नानानंतर पहिले सूर्यनारायणाला अर्थ देऊन नमस्कार करत असत व स्ञिया तुळशीला प्रदक्षणा घालून वंदन करत असत. बदलत्या व आधुनिक जीवनशैलीमुळे आज खरंतर आपण सूर्याकडे बघण्यासही आपणास वेळ नाही परिणामी “डी” जीवनसत्वाचा अभाव दिसून येत आहे. सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व परिपूर्ण व्यायाम देखील आहे. सूर्यनमस्कार करत असताना तो अनेक पद्धतीने केला जातो. काही संस्थांमध्ये 10 अंकात व काही ठिकाणी तो 12 अंकात केला जातो. भगवान सूर्यनारायणाची उपासना म्हणूनही नमस्कार केला जातो. सूर्यनमस्कारांमध्ये आसन व प्राणायांमाबरोबरच मंत्र साधनेची जोड दिलेली आहे. बीज मंत्र ओमकार प्रथम म्हणून सूर्यनमस्कार केला जातो. या सूर्यनमस्कारांमध्ये योगासनांचा अभ्यास आहे प्राणायामाची साधना आहे सूर्यनारायण देवतेची उपासना आहे व मंत्रांचे सामर्थ्य देखील आहे. सूर्यनमस्कार हे शक्यतो सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी केले जातात. परंतु ते करत असताना आपले तोंड सूर्याकडे असावे. रोज जर सूर्य नमस्कार केले तर संपूर्ण शरीर, मन व आत्मा तिन्ही स्तरावर आपणास फायदे मिळतात. शरीरातील रक्तभिसरन,पचनक्रिया सुधारून, बद्धकोष्ठता देखील कमी होते. आपले वजन नियंञित राहण्यास मदत होते . फुफुसाची व हृदयाची कार्यक्षमता वाढून श्वसन प्रणाली चांगली होण्यास मदत होते. त्याचबरोबर एकाग्रता व स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. आपले मन शांत होऊन सकारात्मकता वाढण्यास मदत होते. शरीरातील हार्मोन्सचे संतुलन साधण्यास मदत होते. उगवत्या सूर्याकडे जर आपण त्राटक केले तर आपली दृष्टी सुधारून मनाची एकाग्रता वाढण्यास मदत होते, उगवत्या सूर्यामध्ये कोवळ्या उन्हात कमी वस्त्रामध्ये अर्धा तास बसले तर आपले हाडे मजबूत होऊन कॅल्शियमचे प्रमाण वाढून, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर त्वचा कांती, तेज वाढण्यास मदत होते विविध रंगांच्या बाटल्यांमध्ये पाणी भरून ते पाणी आठ ते पाच दिवस रोज सहा तास उन्हात ठेवून ते जर आपण पिले तर वेगवेगळ्या व्याधींपासून आपणास मुक्तता मिळू शकते. जसे लाल रंगाच्या बाटलीतील आपण पाणी पिले तर पाठीचे कण्याचे विकार, सायटिका व गुडघेदुखी सारखी विकार दूर होऊन पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. नारंगी रंगाच्या बाटलीमध्ये आपण पाणी पिले तर जननसंस्था व मासिक पाळीचे विकार दूर होतात.पिवळ्या रंगाच्या बाटलीत तील पाणी पिले तर मधुमेह, स्थूलता या सारखे विकार दूर होतात निळ्या रंगातील पाणी आपण पिले तर घशाचे, थायरॉईड, मूळव्याधीसारखे विकार दूर होतात, जांभळ्या रंगातील बाटलीतील पाणी पिले तर त्वचेचे आजार व मजा संस्थेचे विकार दूर होतात. असा हा सर्वांग सुंदर परिपूर्ण व्यायाम प्रकार सूर्यनमस्काराचा आपल्या दैनंदिन जीवनात अंतर्भाव केला तर आपले जीवन अधिकच आनंदी बनू शकेल.स्वतःचा आत्मविश्वास, आत्मबल वाढवण्यास नक्कीच मदत मिळेल.
योग गुरु प्रा.बाळासाहेब मोकळ
योगदर्शन योग केंद्र
