
लेखक – नवनाथ अर्जुन पाटिल गायकर
आहुर्ली, ता.ईगतपुरी, जि. नाशिक
४२२ ४०३
मो.नं.९८८१३२९७०९
सन १५ ऑगस्ट १९४७ ला आपला आर्यव्रत,भारत, हिंदोस्थान तथा इंडिया या विविध नावाने ओळखला जाणारा देश ब्रिटिश गुलामगिरीतुन स्वतंत्र झाला. त्या नंतर देशाची भावी वाटचाल कशी असावी? यावर तब्बल तीन वर्ष प्रदिर्घ अभ्यास व चिंतनानंतर डॉ.राजेद्रं प्रसाद यांचे अध्यक्षतेखाली स्थापन घटनासमितीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित व तब्बल शे- सव्वाशे अभ्यासु नेते सदस्य असलेली व मान्य केलेली राज्य घटना सन २६ जानेवारी १९५० रोजी लागु करण्यात आली.
भारताने यावेळी प्रजासत्ताक राज्य पद्धती स्विकारली.
आज आपण प्रजासत्ताक स्थापनेच्या अमृतमहोत्सवी वर्षात भारत पदार्पण करत आहेत.जगात पाऊणशेच्या वर देश आहेत.आणि जगाशी, जगातील देशांशी तुलना केली तर भारत हा जगातला सगळयात मोठा प्रजासत्ताक देश आहे. आणि जगाच्या पाठीवर असंख्य राष्ट्रांमध्ये सातत्याने अस्थिरता असता कपडे बदलावेत तशा घटना बदलल्या जात असतांना भारतात आजही घटनेनुसार कारभार चालतो हे जगातले आठवे आश्चर्यच म्हणायला पाहिजे.
भारताची प्रजासत्ताक पद्धती टिकण्याचे श्रेय या देशातील जनतेला, विचारवंत व निस्वार्थी नेत्यानां नक्कीच दिले पाहिजे.
सन १९७७ मध्ये देशापेक्षा आपण मोठे आहोत असा गर्व होऊन हुकुमशाही अंगात संचारलेल्या इंदिरा गांधी यांना या देशातील अडाणी जनतेने रस्त्यावर उतरुन धडा शिकवलेला आहे.
जयप्रकाश नारायण व त्यांच्या नेतेपणाखाली या देशातील समाजवादी, भाजपा, रा.स्व. संघ, कम्युनिष्ठ असे सगळयाच विचारधारानीं एकत्र येत लोकशाहीची पुनर्स्थापना केली. हा इतिहास ही अद्भुत व परिपक्व प्रजासत्ताक चे महत्त्व अधोरेखित करणारा असा भुषणावह आहे.
देश प्रजासत्ताक पद्धतीने कारभार करतोय, यांस आता ७५ वर्ष पुर्ण झाली आहेत. आणिबाणी चा काळकुट्ट पर्व संपुनही पाच दशकाचा कालावधी उलटला आहे.
एकुण भारतीय प्रजासत्ताक दिनाचे निमित्ताने चिंतन करतानां दोन भाग पडतील.एक आणिबाणी पुर्व व दुसरा आणिबाणी पश्चातचा कालखंड.
आपण खरेच प्रजासत्ताक आहोत, झालोत कि हा देखावा आहे असा सवाल निर्माण होण्यासारखीच स्थिती आज झाली आहे.
प्रजासत्ताक या शब्दाचा सरळ अर्थ आहे प्रजेची सत्ता.म्हंणजे रयतेची सत्ता.किंवा सोपी व्याख्या लोकानीं, लोकांच्या हितासाठी लोकांद्वारे चालवलेले राज्य म्हंणजेच ही प्रजासत्ताक पद्धत होय.
७५ वर्षाचा प्रवास हा खरेतर प्रदिर्घ काळ आहे.आणि या कालावधीत जल्लोष करणे जसे गरजेचे आहे तसेच लोकशाहीची अंमलबजावणीची समिक्षा तथा परिक्षण होणे सुद्धा गरजेचे आहे.
आणिबाणी नंतरच्या कालखंडात या देशातील जनतेने जसे डोक्यावर घेतले, तसे भल्या भल्या नेते व पक्षाचां माज ही उतरवला.
आणिबाणी ची अक्षम्य चुक झाल्यानंतर ज्या जनतेने इंदिरा गांधी यांना नाकारले, त्याच जनतेने इंदिरा विरोधात सक्षम पर्याय देता न आल्याने अवघ्या अडिच वर्षात विपक्षी सरकार ही घालवले व पुन्हा एकदा इंदिरा गांधी यांना सत्ता बहाल केली.
श्रीमती गांधी यांचे हत्येनंतर राजीव गांधी यांना राक्षसी बहुमत देत सहानुभुती व्यक्त केलेल्या जनतेने बोफोर्य भ्रष्ट्राचार व अन्य मुद्दयावर राजीव गांधी यांचेही विमान जमिनीवर आणले.
राक्षसी बहुमत देणार्या जनतेने पुढच्याच निवडणुकीत भ्रष्ट्राचार विरोधी कौल देत राजीव गांधी यांना सत्तेतुन खाली उतरवले.
दुर्दैवाने दुसर्यादां कॉग्रेस विरोधी कौल जनतेने देऊनही सक्षम नसलेल्या विरोधकानां संधीचे सोने करता आले नाही.
पर्यायाने राजकारणाचा खेळखंडोबा होऊन देशाला पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुकीस सामोरे जावे लागले.
१९९० चा हा कालखंड जनतेने आघाडी सरकारचा प्रयोग व्हावा असा कौल दिला होता.मग यात कधी कॉग्रेस सह आघाडी तर कधी भाजपा सह आघाडी ला जनतेने कौल दिला.
सन २०१४ मध्ये मात्र कॉग्रेस ला सक्षम पर्याय मोदी व भाजपचे रुपाने सापडल्याने जनतेने स्पष्ट कौल भाजपला दिला.व सन २०१९ मध्ये या कौलाचीच पुनरावृत्ती केली.
सलग दोनदा स्पष्ट बहुमत दिल्यानंतर जनतेने सन २०२४ च्या निवडणुकीत ४०० पार चा नारा देणार्या भाजपचेही विमान जमिनीवर आणले.
एकुणच भारतीय जनतेने प्रत्येक निवडणुकीत इतका स्पष्ट व संदेश देणारा कौल दिलेला आहे कि भारतीय प्रजेचे कौतुक करावेसे वाटते.भारतीय जनतेमध्ये जात, धर्म, पंथ, भाषा, प्रदेश, आहार, राहणी असा भिन्न भिन्न पणा असतानांही एकसंघ पणा व एक विचार व एक जिनसी पणाचे हेवा वाटेल असेच स्वरुप आहे. असाच व्यवहार आहे.
अलिकडच्या काळात या लोकशाहीच्या ताकदीचा अंदाज येऊन काहिनीं दुरुपयोग सुरु केला आहे.धर्मामध्ये, जाती मध्ये समाजाची विभागणी करुन तसे राजकारण वा करावा चे तंत्र अलिकडे वापरले जाते आहे.हे लोकशाहीला घातक आहे.
धर्म, जात, प्रादेशिक अस्मितेचे नाव घेऊन चुकीचे खेळ मांडणार्या अपप्रवृत्तीनां रोखण्याची गरज आहे.हा भविष्यातील उग्र धोका आहे.
पुर्वी लोकसत्ताक पद्धतीतील निवडणुकीमध्ये वैचारिक सिद्धांतावर आधारीत निवडणुक होत असे.सार्वजनिक जीवनात नैतिकता जपली जात असे.
आज निवडणुक पद्धत इतकी विकृत झाली आहे कि ती फक्त पैसा या मुख्य घटकाभोवती फिरत आहे.घटनात्मक पदे म्हंणजे गडगंज संपत्ती, आधिकार व संरक्षण या लोभानेच मिळवली जाते आहे. जनता उद्विग्न आहे.पण नाईलाजास्तव निवडणुक अर्थकारणाभोवतीच फिरत आहे हे खुप घातक आहे.
सध्या तर राजकारणाने इतके ओंगळवाणे रुप घेतले आहे कि त्यावर लिहणे हा स्वतंत्र लेखाचा विषय होईल.
यावर एकच उपाय आहे, सध्या सुरु असलेल्या निवडणुक प्रक्रियेचे स्वरुप बदलणे गरजेचे आहे.लोकशाहीचा फेर आढावा घेणे गरजेचे आहे.व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अतिरेकी आधिकार व उदंड स्वैराचारास आळा घालणेची गरज आहे.
कोणतेही राष्ट्र हे नियमाच्या चौकटीत काटेकोरपणे बसवणे प्रगतीसाठी तारक आहे.मात्र अतिरेकी स्वातंत्र्यामुळे उन्माद माजुन निर्णायकी स्थिती निर्माण होते.यातुन केवळ विनाशच घडतो.
या सावधानतेच्या हाका टिपण्याची गरज आहे.
आजच्या लोकशाही प्रधान राजवटीतही रामराज्य व शिवरायाचें स्वराज्य ही आदर्श राज्यपद्धती मानली जाते आहे.
लोकशाही मार्गाने वाटचाल करतानां नैतिकतेपासुन फारकत घेतली तर त्या व्यवस्थेचे धिंडवडे उडतात.
आज भारत हा सुशिक्षित लोकाचां देश म्हणुन ओळखला जातो.पण दुर्दैवाने शिक्षण केवळ पोटार्थी हितासाठीच वापरले जात असल्याने कधी काळी प्रथम राष्ट्र ही भावना लोप पावत आहे.हे रोगाचे लक्षण असुन यावर वेळीच ठोस उपायाची गरज आहे.
लोकशाहीवर चढलेला हा अनिष्ट थर साफ करण्यासाठी पुन्हा एकदा जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या नेत्याची व चळवळीची या देशाला नितांत गरज आहे.
लेखक – नवनाथ अर्जुन पाटिल गायकर
आहुर्ली, ता.ईगतपुरी, जि. नाशिक
४२२ ४०३
मो.नं.९८८१३२९७०९
