
कवी.श्री.प्रकाश होळकर ॳॅड.उन्मेश गायधनी
नाशिक (प्रतिनिधी) :महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) पंचवार्षिक निवडणुकीत नाशिक जिल्हा प्रतिनिधींच्या बिनविरोध निवडीची तीस वर्षांची परंपरा यंदाही कायम राहिली आहे. नाशिक जिल्ह्यातून प्रसिद्ध कवी प्रकाश होळकर आणि नाशिक रोड म.सा.प. शाखेचे अध्यक्ष अॅड. उन्मेश गायधनी यांची जिल्हा प्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.निवडणुकीसाठी रविवार, दिनांक 25 रोजी अर्ज माघारीची अंतिम मुदत होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेची पुणे पंचवार्षिक निवडणूक सध्या सुरू असून अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह, कोषाध्यक्ष, पुण्यातील सात स्थानिक कार्यवाह आणि राज्यातील 21 जिल्हा प्रतिनिधी अशा एकूण 31 जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रमुख पदांच्या निवडणुका गाजत असतानाच अनेक जिल्ह्यांत जिल्हा प्रतिनिधींची बिनविरोध निवड झाली आहे.मसापच्या नियमानुसार प्रत्येक जिल्ह्यातील सभासदसंख्येनुसार जिल्हा प्रतिनिधी निवडले जातात. 800 ते 1200 सभासदांसाठी एक, 1200 ते 1600 सभासदांसाठी दोन, तर 1600 पेक्षा अधिक सभासदसंख्या असलेल्या जिल्ह्यांतून तीन जिल्हा प्रतिनिधी निवडले जातात.नाशिक जिल्ह्यात मालेगाव, नांदगाव, लासलगाव, विंचूर, येवला, सिन्नर, नाशिक रोड, नाशिक व जलालपूर अशा नऊ मसाप शाखा असून एकूण 1399 सभासद आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून दोन जिल्हा प्रतिनिधींची निवड होणे अपेक्षित होते.या निवडणुकीसाठी विद्यमान जिल्हा प्रतिनिधी प्रकाश होळकर, अॅड. उन्मेश गायधनी, तसेच नाशिक रोड मसाप शाखेचे उपाध्यक्ष सुदाम हातमाग यांनी अर्ज दाखल केले होते. दोन जागांसाठी तीन अर्ज प्राप्त झाले असले तरी अर्ज माघारीच्या प्रक्रियेत एक अर्ज मागे घेण्यात आल्याने प्रकाश होळकर व अॅड. उन्मेश गायधनी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.प्रकाश होळकर हे गेली सुमारे २५ वर्षे जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असून त्यांच्या साहित्यिक योगदानाला मोठी मान्यता आहे. अॅड. उन्मेश गायधनी हे नाशिक रोड शाखेच्या माध्यमातून साहित्य चळवळीत सक्रिय योगदान देत आहेत.या बिनविरोध निवडीमुळे नाशिक जिल्ह्यातील साहित्यिक वाचक, लेखक व कवी वर्गात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
