
जातेगाव (प्रतिनिधी):येथील जनता विद्यालय जातेगाव येथे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतीकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नेताजींच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. धुळे पी. के. यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी नेताजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
उपशिक्षक श्री.आहिरे एस.डी. यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनप्रवासाविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा” ही घोषणा देऊन नेताजींनी तरुणांमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवली. आझाद हिंद फौजेची स्थापना आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान अतुलनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. नेताजींचे विचार आणि त्यांचे धाडस आजही तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी ‘जय हिंद’ आणि ‘नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
