
लासलगाव, ता. २३ (प्रतिनिधी ) : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने ‘ए.आय. आणि करिअर संधी’ या विषयावर एकदिवसीय करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात निलया फाउंडेशन, पुणे येथील करिअर काउन्सेलर चेतन गोडबोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) क्षेत्रातील वाढत्या संधी, विविध करिअर पर्याय तसेच भविष्यात रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत कौशल्यविकासावर भर द्यावा, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी विभागाचे डॉ. प्रणव खोचे होते. डॉ.खोचे यांनी अध्यक्षीय भाषणात करिअर निवड करताना योग्य मार्गदर्शन व सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विरेंद्र आहेर यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. मनोहर मोरे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभागाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी प्रा.कावेरी गुंड व प्रा.राधा खांडगौरे आणि वाणिज्य शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
