
नाशिक : आजच्या धावपळीच्या जीवनात मुलांच्या हातात संस्काराची शिदोरी देण्याची नितांत गरज आहे. ही गरज ओळखून गीता परिवार, नाशिक यांच्या वतीने आयोजित बालसंस्कार शिबीर जिजाऊ हॉल, गोविंदनगर येथे बालगोपालांच्या आनंदी सहभागात आणि संस्कारमय वातावरणात पार पडले.
या शिबिरात शैलजा ब्राह्मणकर, अमिता नेरकर, प्रदीप ब्राह्मणकर, रत्ना मोरे व प्राजक्ता कडवे यांनी प्रशिक्षक म्हणून प्रेमाने व संयमाने मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातून मुलांना केवळ ज्ञानच नव्हे, तर जीवनात उपयोगी पडणारे संस्कारही मिळाले.

शिबिरादरम्यान मुलांना योगाभ्यास, सूर्यनमस्कार, श्लोक, गाणी तसेच पारंपरिक जुने खेळ शिकविण्यात आले. खेळाच्या माध्यमातून शिकविलेले हे उपक्रम मुलांनी आनंदाने स्वीकारले. दररोज “आज काय नवीन शिकायला मिळणार?” या उत्सुकतेने मुले शिबिरात सहभागी होत होती.
शिबिराचे विशेष आकर्षण ठरली रामायणातील विविध पात्रांच्या वेशभूषेत काढण्यात आलेली शोभायात्रा. बालकांनी पारंपरिक वेशात नटून-थटून सहभाग घेतला. या शोभायात्रेमुळे संपूर्ण परिसरात संस्कृती, भक्ती व आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या उपक्रमात पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

योग, संस्कार, श्लोक, स्तोत्रे व खेळ यांचा सुंदर समन्वय साधणारे हे शिबीर बालकांच्या शारीरिक, मानसिक व नैतिक विकासासाठी उपयुक्त ठरले.
शैलजा ताई, रत्ना ताई, प्राजक्ता ताई व प्रदीप दादा यांच्या उत्तम नियोजनामुळे व समर्पित कार्यामुळे हे शिबीर यशस्वीरीत्या पार पडले.रंगभरण स्पर्धेच्या परीक्षक म्हनुन सौ प्रणिता कोतकर यांनी परीक्षण केले
अशा उपक्रमांतून मिळणारी संस्काराची शिदोरी ही मुलांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारी ठरेल, अशी भावना उपस्थित पालकांनी व्यक्त केली.
