
शिक्षणमहर्षी संभाजीबापू पगारे साहित्यनगरी , भावबंधन मंगल कार्यालय ,मखमलाबाद रोड , श्रीक्षेत्र नाशिक . I7 व 18 जानेवारी २०२६ .
परमपवित्र गोदामाईच्या जलतीर्थात लोककला व साहित्याची महापर्वणी .मकरसंक्रमणाचा साहित्यात्मक व लोककला संवर्धक संग क्रांतियोग .
लोककलांचा गोडवा , साहित्य सरितेची उर्जा , साहित्यानंदी व कलोपासकांची सहृदयता आणि गोदामाईच्या जलतीर्थाची पवित्रता असा पंचरंगी अक्षरमेळा श्रीरामनगरीच्या दरबारी रंगणार आहे . माऊली माय मराठीतलं रामत्व , शिवत्व , देवत्व , गुरुत्व व आत्मत्व या अंगाने चर्चा , चिंतन , मनोमंथन होणार आहे .
मातृभाषा माऊली माय मराठीची विविध रुपे आहेत . अनेक स्वरूपात ती कुठे कुठे प्रगटली आहे . महाराष्ट्र देशी तिच्या उन्नयनासाठी , उत्कर्ष व विकासासाठी चौफेर प्रयत्न , उपक्रम , प्रकल्प , योजना सुरू आहेत .सरकार , संस्था , संघटना , भाषाप्रेमी , साहित्यिक , रसिक , वाचक असे अनेक घटक कार्यरत आहेत . आपली मातृभाषा हा आपल्या जगण्याचा मुख्य आधार आहे . अक्षरांची भाषा , रंगांची भाषा , संकेतांची भाषा , स्पर्शाची भाषा , गंधाची भाषा , रेषांची भाषा , भावभावनांची भाषा , अभिनयाची भाषा , संगीताची भाषा , नृत्याची भाषा , मौनाची भाषा , देहबोली अशी भाषेची अनेक रूपे आहेत . माणूस व्यक्त होतो तिला भाषा म्हणतात . आपल्या मातृभाषेविषयी जिव्हाळा , गोडवा , प्रेम , जवळीक , आत्मीयता , कृतज्ञता असावी . आपुली माय मराठी सगळीकडून प्रगटली .ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीतून , हरिपाठ आणि पसायदानातून . ग्रामसंस्कृतीतल्या जात्यावरील ओव्यातून , अक्षय तृतीयेच्या गाण्यांमधून , लग्नाची हळद दळण्यापासून ते लग्नाच्या सर्व संस्कार प्रसंगी गायल्या जाणाऱ्या लोककाव्यातून . लोककला , लोकनाटय , पथनाट्य , कलापथक , तमाशा, बोहाडा कलावंतांच्या कलाकौशल्य व सादरीकरणातून . पोवाडे , भारूड अन् गौळणी, लावण्यातून .आदिवासी , ग्रामवासी यांच्या स्वयंप्रेरणा व उस्फूर्त लोककलांमधून . भजन , प्रवचन , कीर्तन , आरती अन् सत्संगातून . कथा , कविता , गझल , समीक्षा , रसग्रहण , लेखन , संपादनातून. भाषेचा उगम अंतःकरणातून होतो . भाषा हा धागा आहे माणसं जोडणारा .भाषेतून संस्कार , संस्कारातून संस्कृती . व्यवहारासाठी भाषा हे माध्यम आहे . व्यक्ति , कुटुंब , समाज , राष्ट्र व विश्व या सगळ्यांना जोडणाऱ्या अनेक भाषा भगिनी आहेत . प्रत्येक भाषेची वेगवेगळी गुणवैशिष्ठये , शक्तिस्थळे , सौंदर्यस्थळे , सुगंधस्थळे व आनंदस्थळे आहेत . भाषा भगिनींमध्ये देवाणघेवाण सुरू असते व असावी . श्रेष्ठ कनिष्ठ असा वाद नको .ज्ञानाचं वहन हा उद्देश . महाराष्ट्र देशी व मराठी माणसाच्या जीवनात , सर्व व्यवहारांमध्ये पाझरलेली , भिनलेली ,विखूरलेली माऊली माय मराठीला एका धाग्यात ,सूत्रात गुंफण्यासाठी सुसंघटीत व सुनियंत्रित योजनाबध्द प्रयत्न हवे आहेत . सध्याचे प्रयत्न तुटक तुटक व असंघटीत आहेत . शिवाय त्यात सर्वसमावेशकता नाही . साहित्य संमेलने होतात , त्यात अनेक सुधारणा करायला संधी आहेत .
श्रीक्षेत्र नाशिकमध्ये १७ व १८ जानेवारी २०२६ रोजी मखमलाबादरोडवरील भावबंधन मंगल कार्यालयात गिरणा गौरव प्रतिष्ठानचे गिरणादूत श्रीमान सुरेशजी पवार व पदाधिकारी यांनी आयोजित केलेल्या शेकोटी संमेलनात साहित्यासह लोककलांचा समावेश केला आहे. चाकोरीच्या पलीकडे जाऊन विविध घटकांचा अंतर्भाव संमेलनात केला आहे . संमेलनाच्या संकल्पनेला नवा आयाम देण्याचा प्रयत्न इथं आहे .
ग्रामसंस्कृतीत ज्या कलांनी , कलावंतांनी , प्रथा परंपरांनी मराठी भाषेचा गजर आणि जागर केला साहित्य व कलांची जपणूक केली , मराठी मनाच्या मनोरंजनाची , जागृती व प्रबोधनाची भूक भागविली . अशा लोककला व कलावंतांचा प्रातिनिधीक स्वरूपात सक्रिय सहभाग व त्यांचा यथोचित सन्मान ही शुभसूचक व प्रागतिक घटना आहे .चौफेर प्रवाही ,विखूरलेली माऊली मायमराठी एका धाग्यात गुंफण्याची ही पाऊलवाट आहे .समाजाच्या तळागाळात मातृभाषेचं कार्य करणारे विविध घटक आहेत . त्यांचा शोध घेऊन सुसंघटीत केलं तर माय मराठीच्या उन्नयनाला , उत्कर्ष व विकासाच्या प्रयत्नाला सामर्थ्य व गती मिळेल . श्रीक्षेत्र नाशिकच्या १० व्या मैलावर ओझरच्या अलिकडे पुस्तकांचं हॉटेल चालविणाऱ्या ५ वी शिकलेल्या जोंधळे आजी . काय त्यांचा ध्यास , तळमळ व जनहितैषी भावना . मराठी माणसं भाषेचं , साहित्याचं अंतःकरण ओतून आपआपल्या पध्दतीने कार्य करीत आहेत . त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडून बळ द्यायला हवं .
दोन दिवशीय शेकोटी संमेलन हा जिज्ञासावर्धक प्रयोग आहे . नेहमीच्या साहित्य संमेलनाच्या विषयांसोबत ,लोप पावत चाललेल्या जनसामान्यांच्या जीवनाला ऊब देणाऱ्या लोककला , लोकसंस्कृति , कलावंत , त्यांच्या अंतरंगातून , कलाकौशल्यातून , सादरीकरणातून स्त्रवणाऱ्या मराठीला आवर्जुन स्थान देण्यात आले आहे हे या शेकोटी संमेलनाचे सौंदर्य व शक्तिस्थळ आहे . मराठी , आहिराणी काव्य कट्टयांद्वारे काव्य कुसुमांचा सुगंध दरवळणार आहे . शेकोटीची ऊब , कला कौशल्याची उर्जा व साहित्याचा प्रकाश असा हा माऊली माय मराठीचा ज्ञानयज्ञ संपन्न होत आहे .डॉ . गणेश चंदनशिवे , प्रा .डॉ . लोककलांचे उपासक , कवी , गझलकार , लेखक , साहित्यिक , लोकशाहीर , सारस्वत यांच्या सक्रिय सहयोगाने हे साहित्य संमेलन रंगणार आहे . संमेलनाच्या अध्यक्षपदी अक्षरयात्री अलकाताई दराडे तर
स्वागताध्यक्षपदी साहित्य जगणाऱ्या सुनंदाताई पाटील यांची निवड झाली आहे . नाशिककरांच्यावतीने हुतात्मा स्मारक त्यांचा सन्मान सोहळाही संपन्न झाला . शेकोटी कवी संमेलनाध्यक्षपदी समीक्षक विवेकजी उगलमुगले यांची निवड झाली आहे . त्यांचाही सार्थ गौरव संपन्न झाला . तमाशासम्राट भीमा सांगवीकर संमेलनाचे उद्घाटन करतील . लोककलांचे उपासक श्रीमान गणेश चंदनशिवे यांचा विशेष सन्मान या संमेलनात होईल .विविध क्षेत्रातील [ ४० ] संस्थां व संघटनांचे प्रमुख व दिग्गज अशी खूप अनुभवी माणसं , २३ साहित्यिक संस्था यांना एकत्र गुंफून शेकोटी साहित्य व लोककला संमेलनाचा अक्षरयोग गिरणादूत श्रीमान सुरेशजी पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घडविला आहे . साहित्य पंढरीचे पांडुरंग कविवर्य कुसुमाग्रजांच्या श्रीक्षेत्र नाशिक नगरीतील साहित्यपंढरीच्या वारीत सर्व सुहृदांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे . अभिजात माऊली माय मराठीचा सर्वांगीण उत्कर्ष व विकासासाठी ही एक अभिनव संकल्पना आहे . शेकोटी लोककला साहित्य संमेलन म्हणजे रसिकांसाठी अलौकिक मेजवानी आहे .
अधिक माहितीसाठी संपर्क
गिरणादूत , माणूसमित्र श्रीमान सुरेशजी पवार
९४२३५५६७२८ / ९९७०९०४७२८
सावळीराम तिदमे .
श्रीक्षेत्र नाशिक .
८००७९७५७६० .
