
लोहोणेर येथील जनता विद्यालयात आयोजित स्काऊट-गाईड आनंद मेळाव्याचे उद्घाटन करताना मविप्र देवळा तालुका संचालक विजय पगार, भैय्यासाहेब देशमुख, नितीन आहेर, रमेश आहिरे, दिपक देशमुख समवेत उपस्थित मान्यवर, मुख्याध्यापिका कल्पना शिंदे, उपमुख्याध्यापक निंबा ठाकरे व पर्यवेक्षक विलास निकम. (छाया : सुनिल एखंडे)
विद्यार्थ्यांनी शिक्षणा बरोबर व्यावहारिक कौशल्य आत्मसात करावे.
श्री.विजय पोपट पगार (मविप्र संचालक)
लोहोणेर – येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात आयोजित स्काऊट-गाईड आनंद मेळावा हा केवळ मनोरंजनाचा उपक्रम न राहता विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष जीवनशिक्षण देणारा अनुभव ठरला. या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ व भाजीपाल्याचे स्टॉल लावून विक्री केली. “कमवा आणि शिका” या तत्त्वावर आधारित या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी आर्थिक व्यवहार, नियोजन, संघभावना व ग्राहकांशी संवाद याचे धडे घेतले. या मेळाव्यातून तब्बल पाच ते सात हजार रुपयांची उलाढाल झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र देवळा तालुका संचालक विजय पगार होते. यावेळी माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष नितीन आहेर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश आहिरे, शिक्षक-पालक संघ उपाध्यक्ष दिपक देशमुख, शालेय समिती सदस्य प्रभाकर झाल्टे, दिगंबर कोठावदे, रमेश देसले, पंडित पाठक, वसंत शेवाळे, कमलाकर नेरकर, किशोर जाधव, अनंत शेवाळे, संजय जगताप, माता-पालक संघ उपाध्यक्ष सविता देशमुख, रूपाली धामणे, अश्विनी शेवाळे, दिपाली पगारे, ललिता पवार, संगीता जाधव, वैशाली जाधव यांच्यासह मुख्याध्यापिका कल्पना शिंदे, उपमुख्याध्यापक निंबा ठाकरे व पर्यवेक्षक विलास निकम व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात गीतमंचाच्या स्वागतगीताने झाली. प्रास्ताविकात मुख्याध्यापिका कल्पना शिंदे यांनी आनंद मेळाव्याचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, नेतृत्वगुण, सर्जनशीलता आणि व्यवहारज्ञान विकसित व्हावे, यासाठी असे उपक्रम अत्यंत आवश्यक आहेत. पुस्तकातील ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून शिकविण्याचा हा प्रभावी मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले.यानंतर सरस्वती पूजन,दीपप्रज्वलन व स्काऊट चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्काऊट ध्वजाचे ध्वजारोहण शालेय समिती सदस्य प्रभाकर झाल्टे यांच्या हस्ते झाले. स्काऊट-गाईड पथकाने सादर केलेले शिस्तबद्ध संचलन उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होते.शालेय समिती सदस्य पंडित पाठक यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमांसोबतच जीवनोपयोगी व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज अधोरेखित केली.अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो व ते भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज होतात, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय मनोगतात विजय पगार यांनी आनंद मेळाव्याचे कौतुक करत सांगितले की, हा उपक्रम म्हणजे शिक्षणासोबत व्यवहारज्ञान देणारा जिवंत प्रयोग आहे. लहान वयातच मेहनतीचे मूल्य, आर्थिक शिस्त आणि संघभावना समजल्यास विद्यार्थी सक्षम नागरिक बनतो. विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.यानंतर विद्यालयात नव्याने विकसित करण्यात आलेल्या परसबागेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी लावलेल्या खाद्यपदार्थ व भाजीपाला विक्रीच्या तब्बल ११२ स्टॉल्सना मान्यवरांनी भेट देत विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली. संपूर्ण आनंद मेळाव्यात विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समिती व स्काऊट-गाईड समितीच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख सुनील एखंडे यांनी केले.
