
नाशिक-(प्रतिनिधी )लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागाची शैक्षणिक क्षेत्रभेट नुकतीच मनमाड येथे आयोजित करण्यात आली होती. मनमाड येथील पंचशील वाचनालय, सार्वजनिक वाचनालय येथे मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी डॉ. प्रतिभा जाधव यांचे मार्गदर्शनाखाली भेट दिली. या भेटी अंतर्गत वाचनालयातील संदर्भ पुस्तके विभाग,स्पर्धा परीक्षा पुस्तके विभाग , जुनी दुर्मिळ पुस्तके,विविध साहित्य प्रकारातील पुस्तके, नियतकालिके, वृत्तपत्र इ.विभागांची सविस्तर माहिती वाचनालयाचे संचालक श्री.सुधाकर भाले, कवी जनार्दन देवरे, प्रभाकर खडताळे, श्री.मुकुंद उबाळे यांनी दिली. वाचनालयाच्या ३३ वर्षांची वाटचाल व स्थापनेपासूनचा इतिहास संचालक सुधाकर भाले यांनी विशद केला. याप्रसंगी साहित्यिक डॉ.रमेश इंगोले, डॉ.पालकर यांनीही मार्गदर्शन केले.भाषा व स्पर्धा परीक्षाविषयक अभ्यास व संशोधनाच्या दृष्टीने ही वाचनालय भेट अत्यंत उपयुक्त असल्याचे तसेच महापुरुषांची चरित्रे व आत्मचरित्रे हाताळताना विद्यार्थी भारावून गेले, वाचनाची जिज्ञासा निर्माण झाल्याचे
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगतांतून व्यक्त केले. याप्रसंगी वाचनालयाचे भारती डंबाळे, वसुधा भाले, आश्विनी पंडित, वर्षा लोकनार व संजय साबळे यांनी सहकार्य केले.
सदर प्रेरक अभ्यासभेट व स्नेहभोजनाने विद्यार्थी आनंदित झाले. मराठी भाषा व साहित्यविषयीच्या जिज्ञासा जागृतीसाठी हा उपक्रम उपयुक्त व आनंददायी ठरला आहे. या उपक्रमासाठी डॉ.प्रतिभा जाधव, प्रा.प्रांजली ढेरे, प्रा.संदीप ठाकरे यांनी परिश्रम घेतले व या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
