
लोहोणेर येथील जनता विद्यालयात साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण करताना मुख्याध्यापिका के. ए. शिंदे, पर्यवेक्षक व्ही.एम.निकम तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकवृंद(छाया-:सुनिल एखंडे)
लोहोणेर-: येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात थोर समाजसुधारक, साहित्यिक व शिक्षक साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका के. ए. शिंदे होत्या.यावेळी पर्यवेक्षक व्ही. एम.निकम, शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमात विद्यार्थिनी अनुष्का दशपुते हिने आपल्या मनोगतातून साने गुरुजींच्या जीवनकार्याचा सविस्तर परिचय करून दिला. त्यांनी ‘श्यामची आई’ या अजरामर ग्रंथाचा उल्लेख करत, मातृप्रेम, संस्कार, देशप्रेम व मानवतेचा संदेश साने गुरुजींनी आपल्या लेखनातून समाजापर्यंत पोहोचविला,असे नमूद केले. साने गुरुजी हे केवळ लेखक नव्हते तर ते एक संवेदनशील शिक्षक, समाजसेवक व स्वातंत्र्यलढ्यातील सहभागी होते, असेही तिने प्रभावी शब्दांत सांगितले.यानंतर शिक्षक सुनिल एखंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत साने गुरुजींच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितले की,खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे हा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी साने गुरुजींच्या विचारांतून प्रामाणिकपणा,करुणा, समानता व सेवाभाव आत्मसात करावा,असे आवाहन त्यांनी केले. शिक्षक म्हणून साने गुरुजींनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले, यावरही त्यांनी प्रकाश टाकला.अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापिका के.ए.शिंदे यांनी साने गुरुजींच्या देशसेवा व समाजसुधारणेतील योगदानावर सखोल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, साने गुरुजींनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण समाजासाठी अर्पण केला. त्यांनी लिहिलेली प्रार्थना, साहित्य व विचार आजही विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांची दिशा दाखवतात. विद्यार्थ्यांनी साने गुरुजींच्या विचारांचा आदर्श घेऊन जबाबदार व संवेदनशील नागरिक व्हावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले.याप्रसंगी विद्यालयाच्या गीतमंचाने साने गुरुजींनी लिहिलेली “खरा तो एकची धर्म” ही प्रार्थना सादर करून कार्यक्रमात भावनिक वातावरण निर्माण केले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल एखंडे यांनी केले.
