
सिन्नर (प्रतिनिधी ) चांडक कन्या विद्यालयात हिरक महोत्सवानिमित्त विद्यार्थिनींच्या आरोग्य संवर्धनासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गोरक्ष सोनवणे व विखे संस्थेचे पोपट आव्हाड यांच्या विशेष सहकार्यातून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. विखे पाटील मेमोरियल मेडिकल कॉलेज, चिंचोली येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने ही तपासणी केली. या पथकात डॉ. योगेश बोरसे, डॉ. अभ्यंकर, डॉ. गिरीश पाटील व डॉ. अजित आव्हाड यांचा समावेश होता.
या आरोग्य शिबिरामध्ये विद्यार्थिनींची नेत्र, दंत तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीसोबतच विद्यार्थिनींना स्वच्छता, संतुलित आहार, आरोग्यदायी सवयी आणि आजार प्रतिबंधाबाबत सविस्तर व उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी अत्यंत लाभदायी ठरला.

या प्रसंगी शाळा समिती अध्यक्ष श्रीराम क्षत्रिय, मुख्याध्यापिका सुनीता कर्डीले, पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे, पालक-शिक्षक संघ सदस्य पोपट इलग व सुनील कुऱ्हे, शिक्षक राजहंस माळी, नीलिमा दुसाने तसेच शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या या आरोग्य उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
