
भालूर(वार्ताहर) येथील मविप्र समाज संस्थेच्या जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी शालेय आवारात परसबाग फुलवत त्यातून आलेल्या नफ्यातून आपल्याच शाळेतील गरीब विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करत एक वेगळा उपक्रम राबविला ज्याचे सर्व थरातून कौतुक होत आहे.
इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात मेथी, पालक ,शेपू ,भेंडी ,वांगे.. कोथंबीर आदी भाजीपाला पिकांची लागवड केली होती.एक महिनाभर या भाजीपाला पिकांची योग्य प्रकारे काळजी घेत एक महिन्यानंतर या भाजीपाल्यांची बाजारात विक्री करत त्यातून झालेला नफा आणि या पैशांचे काय करायचे असा प्रश्न पडलेला असतानाच विद्यार्थ्यांनी आपल्याच शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची कल्पना सुचवली. या संकल्पनेचे सर्वानीच स्वागत करत आलेल्या पैशातून गरीब विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप प्राचार्य जी. ए.वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेला असलेला प्रशस्त आवार आणि या आवाराचा वापर करून एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा विचार विद्यालयाच्या शिक्षिका सी.एस.शिनगारे यांनी व्यक्त करत इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसमोर ही संकल्पना मांडली. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभागी होत सुंदर अशी परसबाग फुलवत एक वेगळा उपक्रम राबविला ज्याचे सर्वच थरातून कौतुक झाले.

मुख्यमंत्री पंचायत राज अभियानात “नाविन्यपूर्ण उपक्रम”
राज्यात सध्या मुख्यमंत्री पंचायत राज अभियान राबविले जात आहे. भालूर गावाने या अभियानात आपला सहभाग नोंदवला आहे. येथील शाळेनेही परसबागेचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत या अभियानात सहभाग नोंदवला त्यामुळे शालेय प्रशासन आणि विद्यार्थ्यांचे ग्रामपंचायत कडून कौतुक करण्यात आले.
फोटो: परसबागेतील नफ्यातून घेतलेले गणवेश वाटप करतांना प्राचार्य जी. ए.वैद्य,शिक्षिका सी.एस.शिनगारे आदींसह इतर शिक्षक व विद्यार्थी
