
नाशिक:( प्रतिनिधी)- साहित्यप्रती निष्ठा असल्याशिवाय साहित्य निर्माण होत नाही. कविता हा जाणीवपूर्वक लिहिण्याचा प्रकार आहे. त्यासाठी कवितेच्या अर्थाचा शोध घेता आला पाहिजे, असे प्रतिपादन कवी युवाकवी अभिषेक भंडारे यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या अभिनव उपक्रमामध्ये २०८ वे पुष्प गुंफताना अभिषेक भंडारे ‘कळी उमलताना…’ या पुस्तकावर बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तुकाराम ढिकले होते.
अभिषेक भंडारे पुढे म्हणाले की, प्रगल्भ अनुभव आणि कल्पनाविस्तार यातून निर्माण झालेल्या कविता ह्या माणसाला समृद्ध करत जातात. तेच संस्कार सुप्त प्रतिभेला आयाम प्राप्त करून देतात. निसर्गाशी असलेली एकरूपता साधत कवी नेहमी निसर्गाकडे आकर्षित होतो. निसर्गातील संवेदनशीलता, एकरूपता ही त्याच्या साहित्यातून निर्माण होत असते. माणसाचे आयुष्य आणि निसर्ग आणि मानवी मन याबद्दल चिंतन केले तर सामाजिक विचार प्रकट होतात. यासाठी काव्यप्रतिभा सोबत घेऊन समाज आणि देशाला साद घालणाऱ्या अनेक कविता मानवी जीवनाचा अविभाज्य भाग होतात, असेही ते म्हणाले.
अजित कुलकर्णी आणि पूनम जाधव या भाग्यवान श्रोत्यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले. अर्जुन वेलजाळी यांनी आभार मानले तर मधुकर गिरी यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान येत्या मंगळवारी (१६) रोजी आर्किटेक्ट विजय पवार हे ‘लडाख डायरी’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
