
उपोषण सोडताना लक्ष्मण बोगीर ,विस्तार अधिकारी सरपंच शांताराम पवार सदस्य साहेबराव सोनवणे, रोहन (बापू) फटांगरे तसेच श्रावण भालेराव
नांदगाव (प्रतिनिधी) — ग्रामपंचायत परिसरातील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या उपोषणाला आज अखेर तोडगा निघाला. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यादव साहेब यांनी प्रत्यक्ष उपोषण स्थळी भेट देत संबंधित प्रकरणाची पाहणी केली.
यादव साहेबांनी अतिक्रमणधारक म्हणून तक्रारीत उल्लेख असलेले ग्रामपंचायत संगणक ऑपरेटर सोपान काशिनाथ शिरसाठ (घर क्र. 234) यांच्या जागेची तसेच बांधकामाची स्थळ पाहणी केली. सदर जागेची मोजणी 1956-57 तसेच 2002 च्या ग्रामपंचायत नमुना क्र. 8 रजिस्टर नोंदींच्या आधारे करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
मोजणीअंती अतिक्रमण सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई करून अतिक्रमण निष्कासित करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन विस्तार अधिकारी यादव यांनी उपोषणकर्त्यांना दिले. यासंदर्भात लेखी पत्र दोन दिवसांत देण्याचेही त्यांनी कबूल केले.
प्रशासनाकडून मिळालेल्या या आश्वासनानंतर शुक्रवार, दि. 12 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वा. उपोषण मागे घेण्यात आले. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या हस्तक्षेपाचे स्वागत केले असून प्रकरणाचा निकाल न्याय्य पद्धतीने लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
