
नांदगाव ( प्रतिनिधी )
येथील म.वि.प्र. समाजाचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक मानवी हक्क दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय मराठे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. डॉ. मराठे यांनी आपल्या व्याख्यानातून मानवी हक्क दिवसाचे महत्त्व विशद केले. मानवी हक्कांचे उल्लंघन कोणकोणत्या प्रसंगी होते याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. प्रत्येक व्यक्तीने आपल्या हक्कांप्रमाणेच इतरांच्या हक्कांचा आदर केला तर मानवी हक्क सुरक्षित राहतील. समाजात मानवी हक्कांविषयी जागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे असे विवेचन केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एन.भवरे यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कांची माहिती दिली.विद्यार्थ्यांनी आपले हक्कांविषयी जागृत राहावे असे विवेचन केले. याप्रसंगी प्रा.जी.व्ही.बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्रा.धर्मराज तुंगार,प्रा.वाघ, प्रा.एस.सी. पैठणकर प्रा.बी.जे.गावित व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालय रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.के.पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य डी. एम.राठोड यांनी केले.
