नाशिक:-(प्रतिनिधी )आयुष्यभर अस्मानी-सुलतानी संकटाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्याच्या वाट्याला संघर्ष पूजलेलाच असतो. त्याला अविरत परिश्रमाची जोड मिळाली की यशप्राप्ती निश्चितपणे होते, असे प्रतिपादन सिन्नर महाविद्यालयातील प्रा.डॉ.संजय पवार यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे आयोजित 'पुस्तकावर बोलू काही' या अभिनव उपक्रमात २०७वे पुष्प गुंफताना ते 'कुणब्याची गाथा' या पुस्तकावर बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक मधुकर गिरी होते.
प्रा.डॉ.पवार पुढे म्हणाले की, माझ्या वडिलांचं आजपर्यंतचे जगणं पुस्तकात मांडलं आहे. शेतिप्रधान समाजातील प्रत्येक शेतकरी, कष्टकरी, कुणबी यांच्या जीवनाचे प्रतिनिधिक स्वरूप म्हणजे हे पुस्तक आहे. अतिपर्जन्यमान, सततचा दुष्काळ, निसर्गाचा कोप, प्रखर भाऊबंदकी, वाट्याला आलेली कोर्टकचेरी यामुळे आजचा शेतकरी हवालदिल झाला आहे. पण तरीही संघर्ष करून तो उभा असतो. ती जिद्द, जगण्याची उमेद आम्हाला दाखवणाऱ्या माझ्या वडिलांनी आम्हाला दाखवलेला सचोटीचा मार्ग आम्हाला सदैव प्रेरणादायी वाटतो, असेही ते म्हणाले.
कविता कासार आणि अरुण घोडेराव यांना ग्रंथभेट देण्यात आली. प्रा.डॉ.दत्तात्रय फलके यांनी आभार मानले तर सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान येत्या शुक्रवारी (१२) रोजी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.कैलास कमोद 'भवरे की गुंजन' या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.