
मनुष्य प्राणी हा निसर्गाचा एक अंश आहे. निसर्ग वाचला तरच माणूस वाचणार आहे. निसर्गाच्या नियमांशी साधर्म्य राखले तरच माणसासह सजीवसृष्टी सुखकारक जीवन जगू शकेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले.

तपोवन वाचवा या जनमोहिमेअंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या वार्षिक विशेषांक 2025 च्या प्रकाशन समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.’ तपोवन वाचवा’ या जनमोहिमेच्या पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक अंकाचे प्रकाशन तपोवनात करण्यात आले.
पुढे कांबळे म्हणाले की, झाडं आहेत तर सजीव सृष्टी आहे. असलेली झाडं तोडून नवीन झाडे लावणे किंवा नव्याने झाडे लावणे हा काय त्याच्यावरचा उपाय नाही.

म्हणून नाशिककरांनी आपापल्या घरी नियमितपणे झाडाला मिठी मारण्याची मोहिम सुरु करावी. तपोवन वाचवा ही मोहीम नाशिक सह महाराष्ट्रात आणि देशभर सुरू व्हायला पाहिजे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सेवानिवृत्त सनदी अधिकारी बी.जी. वाघ यांनी निसर्गासंबंधी लाओत्सेच्या निसर्गातील वास्तव्याचा संदर्भ देऊन वनसृष्टीचे महत्त्व प्रतिपादन केले. निसर्गाला ओरबाडून सणसमारंभ,उत्सव साजरे करणे हे माणसाचे निसर्गाशी विसंगत वागणे आहे. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. अस्तित्वात असलेली वनसृष्टी, जंगलं वाचवणं आहे आपल्या हातात आहे. त्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे.
शहर कार्याध्यक्ष कोमल वर्दे, जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक आशा लांडगे यांनी रोपटे देऊन मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या वार्षिक विशेषांक 2025 चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पर्यावरणाची थीम डोळ्यासमोर ठेवून हा अंक तयार करण्यात आलेला आहे. त्याबद्दलही मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.
समारोपात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. टि.आर. गोराणे यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मागील तीस वर्षांपासून सर्व धर्मीयांचे सणसमारंभ, उत्सव पर्यावरण पूरक सादर करण्याबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती केली असल्याचे सांगितले . महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुरू केलेले पर्यावरणपूरक असे नऊ उपक्रम महाराष्ट्र शासनाने स्वीकारले असल्याचेही डॉ. गोराणे म्हणाले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अरुण घोडेराव यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. सिल्केशा अहिरे यांनी केले.
तपोवनातील या प्रबोधन मोहिमेमध्ये राजेंद्र फेगडे, विजय बागुल, कृष्णा चांदगुडे, एडवोकेट विद्या चांदगुडे, विजया गोराणे, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, विजय खंडेराव, एडवोकेट समीर शिंदे
सुनील गायकवाड आदी सहभागी होते.
