
नांदगाव (वार्ताहर) — हिसवळ बु: ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय मोकळ्या जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा चिघळला असून आरटीआय कार्यकर्ते लक्ष्मण निवृत्ती बोगीर यांनी बुधवार, दि. १० डिसेंबर २०२५ पासून बेमुदत उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे
अतिक्रमणाविरोधातील दोन वर्षांची लढा पुन्हा पेटला
ग्रामपंचायतचे संगणक ऑपरेटर सोपान काशिनाथ शिरसाठ यांनी मिळकत क्र. २३४ च्या पाठीमागील ग्रामपंचायतच्या मोकळ्या जागेत घर बांधण्यासाठी पाया खोदण्याचे काम सुरू केले असल्याची तक्रार बोगीर यांनी दि. ७/९/२०२३ रोजी केली होती. यानंतर बांधकाम थांबविण्यात आले होते.
परंतु काही महिन्यांच्या शांततेनंतर १० जून २०२४ ला शिरसाठ यांनी पुन्हा बांधकाम सुरू केले. त्यावेळी बोगीर यांनी १८ जून २०२४ रोजी ज्ञानेश्वर माऊली मंदिरात बेमुदत उपोषण केले होते. त्यावर प्रतिसाद देताना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी १५ दिवसात कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन ग्रामपंचायतीला दिले.
यामुळे उपोषण मागे घेण्यात आले असले तरी ७ डिसेंबर २०२५ रोजी पुन्हा बांधकामास सुरुवात झाल्याचा आरोप बोगीर यांनी केला आहे.
“घरकुलसाठी स्वतःची पडीत जागा असताना शासकीय जागेवर अतिक्रमण” — बोगीर
आरटीआय कार्यकर्ते बोगीर म्हणाले की,
- शिरसाठ यांच्या नावे ग्रामपंचायत योजना मधून घरकुल मंजूर आहे.
- त्यासाठी त्यांची स्वतःची पडीत मिळकत (घर क्र. २३४) उपलब्ध असतानाही ते शासकीय जागेवर अतिक्रमण करत आहेत.
- संबंधित व्यक्ती ग्रामपंचायत कर्मचारी असल्याने “कोणी काही करू शकत नाही” या गैरसमजाचा फायदा घेत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
सरकारच्या विविध आवास योजनांनुसार (प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना इ.) भूमिहीन लाभार्थ्यांनाच जागा उपलब्ध करून दिली जाते. पण शिरसाठ हे भूमिहीन नसून त्यांचे गावठाणात स्वतःचे घर असून तेथे कुटुंबासह वास्तव्य असल्याचे बोगीर यांनी स्पष्ट केले आहे.
प्रशासनाकडून अभय मिळतेय का? गावकऱ्यांमध्ये प्रश्नचिन्ह
सदर बांधकाम तीन वेळा थांबविण्यात आले असले तरी आज पुन्हा सुरु झाल्याने ग्रामस्थांमध्ये ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीकडून मौन अभय मिळत आहे का? अशी चर्चा सुरू आहे.
१० डिसेंबरपासून बेमुदत उपोषण; जीवितास धोका झाल्यास प्रशासन जबाबदार — बोगीर
“अतिक्रमण तात्काळ हटविण्याची कार्यवाही न झाल्यास १० डिसेंबर २०२५ पासून मी ज्ञानेश्वर माऊली मंदिरात बेमुदत उपोषणास सुरुवात करणार आहे.
माझ्या जीवाचे काही अनर्थ झाल्यास ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि संबंधित अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल,” असा निर्वाणीचा इशारा बोगीर यांनी आपल्या अर्जात दिला आहे.
यानंतर ग्रामपंचायत व प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे गावासह तालुक्याचे लक्ष लागले आहे
