
सांगली (गुरुदत्त वाकदेकर) : प्रसिद्ध चित्रकार अनिल दबडे यांच्या नावावर एकाचवेळी दोन विश्वविक्रम नोंदविले गेले आहेत. लंडन बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या दोन्ही विक्रमांत त्यांची नोंद झाली आहे. दबडे यांनी जुन्या पन्नास रुपयांच्या नोटेचे मूळ आकारात जलरंगात अत्यंत बारकाईने आणि हुबेहूब चित्र रेखाटले आहे. नोटेतील सर्व तपशील, रंगसंगती, अशोकस्तंभ आणि सर्व भाषांतील अक्षरे अचूक रेखाटली असून गव्हर्नरची सही त्यांनी मुद्दाम वगळली आहे. एकाच बाजूचे ही प्रतीकृती जशीच्या तशी रेखाटत त्यांनी हा कौशल्यपूर्ण विक्रम साध्य केला.
या विश्वविक्रमासाठी गोव्याच्या बिग फूट संग्रहालयाचे महेंद्र अल्वारिया, गुजरातचे मुख्य संपादक पवन तसेच लंडन बुक ऑफ न्यू रेकॉर्डचे भारतातील प्रमुख डॉ. अविनाश सकुड यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. या विक्रमासाठी दबडेंचे अनेक दिवसांचे प्रयत्न फलदायी ठरले. ‘‘भारताचे आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे,’’ असे दबडे यांनी सांगितले.
अनिल दबडे यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मधून टेक्स्टाईल डिझाईनची पदवी संपादन केली आहे. शर्ट, पँट, काश्मिरी शाल यांसारख्या वस्त्रांच्या जलरंगातील डिझाईन्स तयार करताना वस्त्रनिर्मितीतील सूक्ष्म तपशील रेखाटण्याची कला त्यांनी आत्मसात केली. मिनिएचर पेंटिंगचेही त्यांनी कार्य केले असून, या बारीकसारीक तपशील टिपण्याच्या कौशल्याचा मोठा उपयोग पन्नास रुपयांच्या नोटेचे चित्रण करताना झाला, असे ते सांगतात.
दबडे यांची चित्रकलेवरील ५० पुस्तके प्रकाशित झाली असून, त्यांच्या पन्नासाव्या पुस्तकाचे प्रकाशन पॅरिस येथील आयफेल टॉवरमध्ये करण्यात आले आहे. त्यांनी भारतभर भ्रमंती केली असून २५ देशांचा प्रवास केला आहे. अनेक देशांत त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन झाले आहे. दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि सिशेल्स येथील ग्रंथालयांत त्यांच्या पुस्तकांचा समावेश आहे. शासनाच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षासाठी त्यांची पुस्तके बेस्ट सेलर ठरली आहेत. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी १०० यूट्यूब व्हिडिओ तयार केले असून त्यांना हजारो फॉलोअर्स आहेत.
पूर्वी ते ज्युबिली कन्या शाळेत कला शिक्षक म्हणून कार्यरत होते. उद्योगपती, चित्रपटसृष्टीतील मान्यवर आणि अनेक नेत्यांकडेही दबडे यांची चित्रे पाहायला मिळतात. त्यांच्या विद्यार्थ्यांनी चित्रकलेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. इतरांना शिकवताना त्यांनी स्वतः चार पदव्या प्राप्त केल्या आहेत. त्यांना शंभरहून अधिक पुरस्कार आणि सन्मानचिन्हे प्राप्त झाली आहेत. त्यांच्या कलाकृतींचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे — हात न उचलता एकाच रेषेत गणपती तसेच इतर पोर्ट्रेट्स रेखाटण्याचे अनोखे कौशल्य, ज्याचे सर्वत्र कौतुक होते.
