
सायखेडा (प्रतिनिधी) मविप्र संचलित जनता इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सायखेडा येथे शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन पार पडले, यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपकरणे प्रदर्शनात ठेवली .सर्वाधिक जास्त उपकरणे हे शेती संशोधनाच्या विषयी निगडित होती यामुळे बाल वैज्ञानिकांमध्ये शेतीमध्ये सर्वाधिक संशोधन करण्याची प्रवृत्ती आहे असे दिसते असे प्रतिपादन मविप्र संचालक शिवाजी आप्पा गडाख यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवान बालाजी संस्थान मठाधिपती स्वामी कमलाकांतजी महाराज होते.

तर व्यासपीठावर माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष विजय कारे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन गावले, प्राचार्य रामदास वाजे ,उपमुख्याध्यापिका अलका अहिरे ,पर्यवेक्षक सोमनाथ आहेर उपस्थित होते. यावेळी विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मविप्र संचालक शिवाजी आप्पा गडाख यांच्या शुभहस्ते फलक अनावरण व कबुतरे आकाशात सोडून करण्यात आले तर दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन विविध मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी लहान गटात 65 तर मोठ्या गटात 57 उपकरणे विद्यार्थ्यांनी मांडली होती. 44 विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या संदर्भात वैज्ञानिक रांगोळी काढली होती. विज्ञान प्रदर्शनात वेस्टेज कचऱ्यापासून वीजनिर्मिती, रस्ता वळणावरती ऑटोमॅटिक सिग्नल लाईट, मॅग्नेट कार, साध्या पद्धतीने वेल्डिंग साठी गॅस, शेतीसाठी तुषार सिंचन ,फवारणी, खत टाकणेआणि गवत कापणे असे थ्री इन वन उपकरणे, प्रदर्शनामध्ये खास करून आकर्षण ठरली. प्रदर्शन यशस्वीतेसाठी विज्ञान समिती व विज्ञान छंद मंडळ यांनी विशेष प्रयत्न केले व सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांचे सहकार्य लाभले.
