
नाशिक (वार्ताहर) जि. प. प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील आदर्श शिक्षिका श्रीमती अंजना कोकणी यांचे पती कै. रतन हासाराम बागुल यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त कोकणी परिवाराने शासकीय अंधशाळा नाशिकरोड येथील अंध विद्यार्थ्यांना सामाजिक दातृत्वाच्या उदात्त हेतूने मिष्टान्नाचे भोजन व शैक्षणिक साहित्याचे वितरण केले.

श्रीमती कोकणी यांचे पती जि. प. प्राथमिक शिक्षक होते. त्यांचे गतवर्षी अल्पशा आजाराने अकाली निधन झाले. श्रीमती कोकणी यांनी पतीच्या निधनानंतर परिवाराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा अभिनव सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करुन समाजापुढे एक चांगला वस्तुपाठ घालून दिल्याने त्यांची समाज माध्यमात प्रशंसा होत आहे. यावेळी अंधशाळेचे अधिक्षक पी. एस. घाटे, ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष राजाराम गायकवाड विवेकानंद केंद्राचे माजी नगरप्रमुख प्रा. अमोल अहिरे, सामाजिक कार्यकर्त्या अमृता अहिरे, वैष्णवी कोकणी, राम अहिरे, कर्मचारी भारती पट्टेबहादुर, मदतनीस यमुना भोसले, पहारेकरी एस. एम. गुराळे आदी उपस्थित होते.
यावेळी अंध मुलांना मिष्टान्नाचे भोजन, खाऊ, खेळणी, ध्वनीफित, शाळेला घड्याळ, विवेकानंदांची प्रेरणादायी पुस्तके व ग्रंथसंच भेट देण्यात आले. उभयतांनी या प्रज्ञाचक्षु मुलांच्या समवेत एकत्रितपणे भोजनाचा आस्वाद घेतला, शिवाय त्यांची दिनचर्या जाणून घेतली. सामान्यांना केवळ नजर असते, मात्र या मुलांना जीवनात स्वयंसिद्धतेने यशस्वी वाटचालीची दिव्य दृष्टी आहे. त्यांच्या भावविश्वात काही काळ रममाण होऊन वर्षश्राध्दाचा दिवस सत्कारणी लागल्याची भावना श्रीमती कोकणी यांनी यावेळी व्यक्त केली.

या प्रज्ञाचक्षु मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यांच्या जीवनात कायमचा काळोख असूनदेखील त्यांच्या वागण्या, बोलण्यात व वावरण्यातील सहजता कमालीची होती. सामान्य मुलांप्रमाणेच उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द, चेहऱ्यावरील तेज व कमालीचा आत्मविश्वास दिसून येतो. या मुलांच्या वैचारिक उंचीपुढे आपल्यातील थिटेपणाची वेळोवेळी जाणीव होते अशी भावना प्रा. अमोल अहिरे यांनी व्यक्त केली.
