
व्यक्ती म्हणून आता जे भोगतो ते मागच्या जन्माचे पाप आहे. आपल्या हातात काही नाही. या जन्मात जे काही चांगलं करू त्याचं फळ कुठल्यातरी पुढच्या जन्मात मिळणार. म्हणून आत्ता आहे ते सोसलंच पाहिजे, असं मानून लोक जगत राहतात.
म्हणजे आपण एक कळसुत्री बाहुली आहोत. याला कर्मविपाक सिद्धांत म्हणतात. तो अत्यंत तर्कदुष्ट तर आहेच शिवाय अशा अवैज्ञानिक सिद्धांताला आपल्या देशात तत्त्वज्ञानाचं सामर्थ्य लाभाव ही एक अत्यंत दुःखद आणि निषेधार्ह घटना आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ.ठकसेन गोराणे यांनी केले.
सिन्नर येथील सामाजिक कार्यकर्ते देविदास व संजय गुजर यांचे वडील रामनाथ नानाशेठ गुजर यांच्या दशक्रिया विधीत समाज प्रबोधन करताना डॉ. गोराणे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आत्मा नावाची गोष्ट आधुनिकौ वैज्ञानिक कसोट्यावर अजून तरी सिद्ध झालेली नाही. तरीही लोक आत्मा नावाच्या कल्पनेवर श्रद्धा ठेवतात आणि श्रद्धेला तपासण्यास नकार देतात.
कर्मविपाक सिद्धांतामध्ये मोक्षाची लालूच दाखवली जाते. त्यामुळे एका फटक्यात माणसाचे आयुष्य पराधीन ठरते. त्यातून एक विषमता जन्म घेते. नशीब, प्रारब्ध, दैव, संचित या कल्पनांनी तिचं समर्थन केले जाते.
खरंतर ग्रहगोलांच्या गतीने माणसांचे जीवन घडत नाही तर ते समाजाची स्थिती आणि माणसांची कर्तृत्ववान मती यांच्या युतीवर ते घडत जाते.
मात्र आपल्या समाजात हे घडलं नाही.
एका मोठ्या समूहाला आहे तसाच ठेवण्यात आलं. त्याने बंड करू नये, म्हणून जे आहे ते नशीब, दैव, संचित अशा अंधश्रद्धा युक्त गोष्टी त्याच्या माथी मारण्यात आल्या. त्याच्यातच व्यक्तीचा व समाजाचा उत्कर्ष असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे विचार करण्याची, विवेकी वर्तन करण्याची बुद्धीच माणसं हरवून बसली.
जगात सरंजामशाहीमध्ये शोषण अस्तित्वात होते. मात्र भारतात कष्ट न करणारे हे कष्ट करणाऱ्यांचे शोषण करतात, याला कारण येथील व्यवस्था ही दैववादी आणि परलोकवादी आहे. इथे इहवादी व्यवस्था नाही.
म्हणून ही व्यवस्था बदलण्यासाठी या दैववादी कल्पनेविरुद्ध बंड करायला माणसांना प्रेरणा दिली पाहिजे. कारण ही मानसिक गुलामगिरी समाजाला सतत पारतंत्र्यात ढकलत आली आहे. त्यामुळे परिवर्तनाची आशाच मावळते.
वडिलांच्या मृत्यूनंतर गुजर कुटुंबियांनी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ वृक्षारोपण तसेच काही सामाजिक संस्थांना यथाशक्ती योगदान दिल्याचे विधायक कार्य केल्याचे डॉ. गोराणे यांनी सांगितले.
महामित्र दत्तात्रय वायचळे यांनी यावेळी देहदान आणि अवयवदान याबद्दलची शास्त्रीय माहिती देऊन त्याची गरज प्रतिपादन केली.
यामुळे आपल्याला मृत्यूनंतरही मानवतेच्या भावनेतून उपकृत होता येते, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुजर कुटुंबीयांसह सिन्नर येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राजेंद्र मिठे, अरुण घोडेराव, डॉ. श्यामसुंदर झळके, दीपक भालेराव, सुखदेव वाघ आदींनी परिश्रम घेतले.
