
लोहोणेर येथील जनता विद्यालयात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमा पूजन करताना पर्यवेक्षक व्ही. एम.निकम समवेत उपस्थित शिक्षकवृंद (छाया- सुनिल एखंडे)
लोहोणेर-:( प्रतिनिधी )लोहोणेर येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात भारतरत्न,संविधान निर्माता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात पर्यवेक्षक व्ही.एम. निकम यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. व्यासपीठावर शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.प्रास्ताविकात शिक्षक सुनिल एखंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची महान कार्यगौरवशाली परंपरा उलगडत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.तसेच त्यांनी समानता,बंधुता, स्वातंत्र्य या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.विद्यार्थिनी ऋतुजा पवार हिने आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील संघर्ष, शिक्षणाची जिद्द, अस्पृश्यतेविरोधातील लढा व भारतीय संविधान निर्मितीत त्यांच्या योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली.शिक्षण हेच खरे शस्त्र आहे.हा बाबासाहेबांचा संदेश आजही विद्यार्थ्यांना पाऊलोपाऊल पुढे नेणारा दीपस्तंभ आहे, असे ती म्हणाली.अध्यक्षीय मनोगतात पर्यवेक्षक व्ही.एम.निकम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सर्व वंचित,शोषित व दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर केलेल्या अथक कार्यावर प्रकाश टाकला. संविधानातून सर्वांना समान हक्क व संधी देण्याचा त्यांचा प्रयत्न ही भारतीय लोकशाहीची भक्कम पायाभरणी असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख शिक्षक सुनिल एखंडे यांनी केले व कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
