नाशिक(प्रतिनिधी):- संवेदनशील मन असल्याशिवाय कोणतेही साहित्य निर्माण होत नाही. उत्तम जगण्यासाठी शब्दांचा आधार घेऊन कविता जन्माला येत असतात. अशा कवितेतील भावनांनी ओथंबलेले शब्दच जगण्याचा आधार बनतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रवी ठाकूर यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे आयोजित 'पुस्तकावर बोलू काही' या अभिनव उपक्रमात २०६वे पुष्प गुंफताना ते 'शिल्लक कविता' या पुस्तकावर बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अर्जुन वेलजाळी होते.
कवी ठाकूर पुढे म्हणाले की, भोवतालाकडे पाहताना आपली दृष्टी वेगळ्या जाणिवेची हवी. माणसाचे भौतिक अस्तित्व आणि त्यांचे स्वत्व यांच्या अस्मिता या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. आत्मभानाच्या जाणिवेपर्यंत कविता आपल्याशी बोलत राहते. हे बोलणे केवळ निरर्थक नसते तर जगण्याची एक नवीन प्रेरणा असते. आश्वासक जगण्याची आशा निर्माण करणारे शब्द माणसाला सत्य आणि काळासह वेगळी प्रेरणा देत असतात. शब्दांचा आधार घेऊन कवी मार्गक्रमण करत असतो, असेही ते म्हणाले.
केशव मोरे आणि उज्ज्वला वडनेरे यांना ग्रंथभेट देण्यात आली. ॲड.मिलिंद चिंधडे यांनी मानले तर सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान येत्या मंगळवारी (९) रोजी प्रा.डॉ.संजय पवार 'कुणब्याची गाथा' या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.