
नागपूर 🙁 प्रतिनिधी )अक्षरक्रांती फाऊंडेशनद्वारा उत्कृष्ट कवितासंग्रहाला दिला जाणारा मानाचा साहित्य पुरस्कार यावर्षी कवी दिनेश गावंडे आकोला यांच्या *लख्ख कंदीलाच्या उजेडात* कवी किरण भावसार, सिन्नर (नाशिक ) यांच्या *घामाचे संदर्भ* तसेच डॉ. मंदा नांदूरकर यांच्या *फुलकई* या बालकवितासंग्रहाला जाहीर झाला आहे. अक्षरक्रांती साहित्य पुरस्कार हा दर्जेदार साहित्य निर्मिती करणाऱ्या कवितासंग्रहाला दरवर्षी प्रदान करण्यात येतो. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंतचे प्रकाशित कवितासंग्रह यात ग्राह्य धरले गेले असले तरी, कोरोना काळापासून (२०२०) अक्षरक्रांती पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्हते. पुरस्कारासाठी जानेवारी २०२० पासून डिसेंबर २०२४ पर्यंतच्या प्राप्त झालेल्या २५० च्या वर कवितासंग्रहामधून सदर तीन कविता संग्रहाची निवड केली गेली. हा पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र शासन अनुदानित दोन दिवसीय ‘अक्षरक्रांती जिल्हा साहित्य महोत्सवा’त येत्या २७ डिसेंबरला महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशीमबाग, नागपूर येथील सभागृहात सकाळी १० वाजता उदूघाटन सोहळ्यात प्रदान कारण्यात येईल. असे अक्षरक्रांती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शंकर घोरसे यांनी कळविले आहे.
पुढील वर्षीपासून कविता संग्रहासोबतच इतरही साहित्य प्रकार पुरस्कार योजनेत समाविष्ठ करण्याचा संस्थेचा मानस आहे. शाल, श्रीफळ, रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ असे पुरस्कारांचे स्वरूप आहे. दोन दिवसीय अक्षरक्रांती साहित्य महोत्सव हा राम गणेश गडकरी प्रतिष्ठानद्वारा प्रायोजित असून कला गौरव संस्था व अक्षरक्रांती फाऊंडेशन द्वारा आयोजित केला गेला आहे. साहित्य महोत्सवाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक वसंत वाहोकर असून स्वागताध्यक्ष म्हणून वनराई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी असून उद्घाटक विदर्भ साहित्य संघांचे अध्यक्ष मा. प्रदीप दाते आहेत. अतिथी म्हणून ‘दै.महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक तथा महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य मा. श्रीपाद अपराजित, माजी संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक मा. सुरेश पाचकवडे व प्रसिद्ध कादंबरीकार मा. उर्मिला देवेन टोकियो, जपान प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत तसेच समारोपीय सत्राचे अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य मंडळाचे सदस्य डॉ. गजानन नारे, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे, विदर्भ साहित्य संघांचे डॉ. तीर्थराज कापगते, मा. अशोक मानकर, तथा प्रसिद्ध कवी मा. मनोज भारशंकर, अबुधाबी (युएई) प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
नागपूर परिसरातील लोकांनी या दोन दिवसीय साहित्यिक मेजवानीचा आनंद घ्यावा; असे अक्षरक्रांती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शंकर घोरसे व कला गौरव संस्थेच्या अध्यक्ष डॉ. संगीता बानाईत यांनी कळविले आहे.
