
डुबेरे येथील जनता विद्यालयात शालेय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
सिन्नर प्रतिनिधी( सोमनाथ गिरी ) -:- विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाची गरज व आवश्यकता आहे . विज्ञान प्रदर्शनांमुळे संशोधन वृत्तीस चालना मिळते व त्यातूनच भावी शास्रज्ञ तयार होतात असे मत श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नारायण वाजे यांनी केले.

मराठा विद्या प्रसारक समाज संचलीत डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून श्री.वाजे बोलत होते . व्यासपीठावर माजी सरपंच रामनाथ पावसे, मुख्याध्यापक रंगनाथ उगले,पर्यवेक्षिका जयश्री पगारे ,जेष्ठ शिक्षक सोमनाथ गिरी , रामदास वारुंगसे,कचेश्वर शिंदे,मारुती डगळे, विष्णू पवार आदी उपस्थित होते . मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे तालुका संचालक कृष्णाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विज्ञान आयोजित करण्यात आले.
आपल्या प्रास्तविकात मुख्याध्यापक रंगनाथ उगले यांनी विज्ञान प्रदर्शनाचा हेतू स्पष्ट करून संकल्पना व विचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाची गरज असल्याचे सांगितले .परीक्षक प्राजक्ता दशपुते ,रेवणनाथ कांगणे यांनी मनोगत व्यक्त केले. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन नारायण वाजे तर वैज्ञानिक रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन सरपंच रामनाथ पावसे यांच्या हस्ते करण्यात आले.इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक संकल्पना विविध उपकरणाच्या माध्यमातून स्पष्ट केल्या.विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जा, आधुनिक शेती, दळणवळण, पर्यावरण, प्रदूषण आदींसह विविध विषयांवर उपकरणे व प्रतिकृती तयार केल्या. प्राथमिक गटात ४० तर माध्यमिक गटात ३५ असे मिळून ७५ उपकरणे विद्यार्थ्यांनी तयार केली. रांगोळी स्पर्धेतुन वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट केल्या. मुलींनी २० वैज्ञानिक रांगोळ्या काढल्या.विद्यार्थ्यांनी आपली कला रांगोळीच्या माध्यमातून दाखवून दिली.नाशिक येथील रमाबाई आंबेडकर विद्यालयाच्या विज्ञानशिक्षिका प्राजक्ता दशपुते यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.सूत्रसंचालन राजश्री बोडके यांनी तर आभार शालेय विज्ञान समितीचे प्रमुख डी.ए. रबडे यांनी केले. डी.ए. रबडे,विज्ञान छंद मंडळ प्रमुख रेवणनाथ कांगणे, योगिता गायधनी, सिद्दी आहेर,रेखा खंडीझोड, सुनिल ससाणे आदींसह विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
