
नाशिक (वार्ताहर) – आधुनिक संगणकीय व तांत्रिक युगात मोबाईलच्या मोहपाशातून सुटका करून मेंदूला सुयोग्य चालना देण्यासाठी श्रमसंस्कार शिबीर एक उत्तम माध्यम आहे. सात दिवसीय शिबिरातून स्वयंसेवकांवर विचारांचे संस्कार होतात. त्यांच्यात दडलेल्या सुप्त गुणांचा विकास होतो. स्वावलंबी जीवनाचा अनुभव येतो, प्रेरणा मिळते जी आयुष्यभर राष्ट्रनिर्मितीच्या कार्यास उपयोगी ठरते. असे प्रतिपादन विवेकानंद केंद्राचे मा. नगरप्रमुख तथा उपक्रमशील प्राध्यापक अमोल अहिरे यांनी केले.

साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या के. जे. मेहता हायस्कूल व इ. वाय. फडोळ ज्यु. काॅलेज नाशिकरोड यांच्या चेहडी येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात ‘व्यवहारात राष्ट्रभक्तिः’ या विषयावर प्रा. अहिरे बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीमती एम. एस. कर्डिले होत्या. प्रसंगी प्राचार्या श्रीलेखा पाटील, प्रा. अनिल देशमुख, प्रा. मंगेश जोशी, प्रा. श्रीमती एस. एन. कुलकर्णी यांच्यासह बहुसंख्येने शिबिर स्वयंसेवक उपस्थित होते. शिबिरातून स्वयंसेवकांच्या व्यक्तिमत्त्वचा सर्वांगीण विकास होतो, स्वावलंबी जीवनाचा अनुभव मिळतो, त्याग, सेवा, श्रमाचा संस्कार होतो, विविध उपक्रम व तज्ज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानातून ऊर्जा, ज्ञानप्राप्ती व कार्याची योग्य दिशा मिळते. स्वयंसेवकांनी ग्रामीण विकासासाठी शिक्षणाचा व आपल्यातील संशोधक वृत्तीचा अधिकाधिक उपयोग करावा असे आवाहन प्रा. अहिरे यांनी केले. यावेळी आराध्य अहिरे याने गीतेच्या आठव्या अध्यायातील काही श्लोकांचे पठण करुन श्लोकांचा अनुवाद केला. प्रस्ताविक व परिचय प्रा. अनिल देशमुख यांनी करुन दिला. सूत्रसंचालन प्रज्वल बनकर याने केले, तर आभार जयेश गवळी याने मानलेत.
